किरण चौधरी
महाशिवरात्रीनंतर रमजान ईद व आगामी चैत्र नवरात्रोत्सवाचे पर्व जवळ आल्याने बाजारपेठेत फळांना मोठी मागणी वाढली आहे. महागडी व स्वादात कमी पडणारी सफरचंद, खरबूज, टरबूज व द्राक्षांच्या तुलनेत अत्यल्प उपलब्ध असलेली खान्देशी केळी सध्या ग्राहकांची पहिली पसंती ठरत असून केळीमालाच्या भावात ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल अशी लक्षणीय वाढ झाली आहे.
यंदा थंडी दोन महिने उशिरापर्यंत कायम राहिल्याने केळीच्या घडांच्या परिपक्वतेस विलंब झाला. परिणामी बाजारातील घटली. आवक मकरसंक्रांतीनंतरही रात्रीच्या तपमानात अपेक्षित वाढ न झाल्याने केळीमालाची उपलब्धता कमीच राहिली. अशा स्थितीत सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने केळी उत्पादकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
द्राक्षांच्या उत्पादनात घट व दर्जात घसरण, तसेच टरबूज-खरबूज आणि सफरचंदाचे वाढलेले दर यामुळे स्वस्त, पौष्टिक व सहज उपलब्ध पर्याय म्हणून केळीची मागणी झपाट्याने वाढली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत केळीच्या बाजारभावात सातत्याने तेजी नोंदवली जात आहे.
केळी भावात महिनाभरात झालेली वाढ (प्रतिक्विंटल)
१५ ते ३१ जानेवारी - १५०० ते १६५०रु.१ ते ७ फेब्रुवारी - १६५० ते १७०० रु.७ ते १० फेब्रुवारी - १७५० ते १९२५ रु.११ ते १८ फेब्रुवारी- २०२५ ते २२२५ रु.
थंडी उशिरा ओसरल्याने केळी परिपक्वतेस विलंब झाला. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दरात मोठी तेजी निर्माण झाली आहे. ही तेजी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे.- किशोर गणवाणी, केळी निर्यातदार व्यापारी, रावेर.
लगतच्या राज्यांत केळीची उपलब्धता कमी असल्याने रावेर पट्ट्यातील मालाला चांगली मागणी आहे. सणासुदीमुळे बाजारभाव टिकून राहतील. - विशाल अग्रवाल, केळी निर्यातदार शेतकरी, अटवाडे ता. रावेर.
रमजान महिन्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे काही दिवस तरी भावात तेजी राहील. दुसरीकडे केळीची आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. - मुस्तकीन बागवान, केळी व्यापारी, जळगाव.
सध्या केळीची आवक कमी असली तरी एप्रिलपासून येणाऱ्या नवतीलाही तेजीचा फायदा होईल. त्यामुळे उत्पादकांना फायदा होणार आहे. - पंकज सोमाणी, केळी उत्पादक शेतकरी, पिंप्राळा.
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातून दररोज ४० ते ५० ट्रकद्वारे केळीमालाची वाहतूक होत होती; आता हा आकडा २० ट्रकांपर्यंत पोहोचला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा तसेच जम्मू-काश्मीर या भागात मोठ्या प्रमाणावर केळी पाठविली जात असल्याची माहिती रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सूत्रांनी दिली.
सध्या मध्य प्रदेश, शहादा परिसर तसेच गुजरात व उत्तर प्रदेशात केळीची उपलब्धता कमी असून रावेर, यावल, मुक्ताईनगर या पट्ट्यातूनच मर्यादित प्रमाणात आवक सुरू आहे. त्यामुळे धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर ही तेजी दीड-दोन महिने टिकून राहण्याची शक्यता आहे. निर्यातीने अधिक वेग घेतल्यास दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
Web Summary : Festival demand and reduced supply have caused banana prices to jump by ₹700/quintal. Lower grape production and expensive apples drive consumers to affordable bananas. Prices are expected to remain high for a while.
Web Summary : त्योहारों की मांग और कम आपूर्ति के कारण केले की कीमतों में ₹700/क्विंटल की वृद्धि हुई है। कम अंगूर उत्पादन और महंगे सेब उपभोक्ताओं को किफायती केले की ओर आकर्षित करते हैं। कीमतों के कुछ समय तक उच्च रहने की उम्मीद है।