Join us

केळीचे भाव गडगडले; भावाच्या तफावतीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:32 IST

Banana Market Rate : जुलै महिन्यात विदेशात जाणाऱ्या केळीला २ हजार २०० रुपयांवर भाव होता. परंतु, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केळीचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

जुलै महिन्यात विदेशात जाणाऱ्या केळीला २ हजार २०० रुपयांवर भाव होता. परंतु, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केळीचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत व कळमनुरी या दोन तालुक्यांत केळीचे विक्रमी उत्पादन काढणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. त्या पाठोपाठ पपईच्या बागांचीही लागवड शेतकरी करत आहेत. परंतु, यंदा पपई पिकावर रोग पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे.

गत जुलै महिन्यात केळीला प्रति क्विंटल २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत होता. श्रावण महिन्यात यापेक्षाही जास्त भाव केळीला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विदेशात जाणाऱ्या दर्जेदार केळीला प्रति क्विंटल १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे.

देशात १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांपर्यंत केळीला भाव मिळत आहे. १५ दिवसांत चारशे रुपयांनी केळीचे भाव कमी झाले आहेत. केळीचे भाव गडगडले असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुरुंदा, गिरगाव, सोमठाणा, किन्होळा, बोरगाव, नेहरूनगर आदींसह कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, डोंगरखडा, जवळा पांचाळ, वारंगा आदी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत आहेत.

सध्या सर्वत्र श्रावण महिन्यात बाजारात केळीची आवक देखील वाढली आहे. केळीचा भाव अधून-मधून उतर असेल तर केळीचे पीक घ्यावे तरी कशाला? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकरी विचारु लागले आहेत. सद्यःस्थितीत शेतकरी आर्थिक कोंडीत पहावयास मिळत आहेत.

वसमतमध्ये केळीचे सर्वाधिक उत्पादन

हळद उत्पादनामुळे वसमत तालुका ज्याप्रमाणे ओळखला जातो. त्याचप्रमाणे केळीच्या बाबतीत तालुक्यातील शेतकरी मागे नाहीत. किमान ३० ते ३८ किलो घडांपर्यंत शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. काही दिवसांपासून दर्जेदार केळीसाठी तालुका ओळखला जात आहे. दररोज जवळपास १० गाड्या येथून विदेशात केळी जात आहे. केळीच्या भावात चढउतार येत असल्याने केळी उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे, असे शेतकरी कामाजी सिद्धेवार यांनी सांगितले.

केळी काढणे सुरु होताच भाव घसरले

जुन, जुलै या दोन महिन्यात केळीला मागणी होती. भावही २ हजार २०० रुपयांवर जावून पोहोचले होते. नवीन बागास सुरुवात होताच केळीचे भाव घसरले आहेत. या भावाच्या तफावतीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. - संगमनाथ गुरुडे, शेतकरी.

हेही वाचा : 'धामणगाव'चा सेंद्रिय शेतीचा गट करतोय वार्षिक दीड कोटींची उलाढाल; समूह शेतीतून विकास साधणाऱ्या गावाची वाचा कहाणी

टॅग्स :केळीबाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरीहिंगोली