Join us

Banana Market : सध्या केळीचे दर कसे आहेत, नवरात्रीत भाव वाढतील का? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:30 IST

Banana Market : शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात केळीची मागणी वाढण्याची केळी उत्पादकांना अपेक्षा आहे.

जळगाव : व्यापाऱ्यांच्या मनमानीने गत महिनाभरापासून केळीचे भाव (Banana Market) पाडले जात असल्याचा आरोप केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात होता. मात्र आता उत्तर भारतातील पूर परिस्थिती नियंत्रणात आल्याने तथा जम्मू-कश्मीर, श्रीनगरसह उत्तर भारतातील रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याने केळी उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात केळीची मागणी वाढण्याची केळी उत्पादकांना अपेक्षा आहे. त्यामुळे केळीच्या बाजार भावात मोठी वाढ होऊ शकते. आतापासूनच केळीच्या बाजारभावात काही प्रमाणात वाढ होत आहे. बऱ्हाणपूरच्या केळी लिलाव बाजारातील बनवाबनवी काही दिवसांपूर्वीच सर्वांसमोर आली होती. यामुळे केळी उत्पादकांमध्ये संताप व्यक्त होत होता. त्यात केळीचे भाव कृत्रिमरित्या पाडण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. 

दरम्यान, बऱ्हाणपूरच्या केळी लिलाव बाजारावर जिल्ह्याचे केळीविषयक अर्थकारण अवलंबून असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर तातडीची बैठक घेतली होती. अखेरच्या २० किमान सौद्यातील बाजारभावांची सरासरी काढून किमान भाव घोषित करण्याचा व केळी बाजारातील अवैध व्यापाऱ्यांची सातत्याने तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या उपाययोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात कठोर आला होता.

केळी बाजारभावात ११५० रुपये प्रतिक्विंटल वरून १६०० रुपये प्रतिक्विंटल कमाल तर किमान भावात ४०० वरून ६५० पर्यंत वाढ झाली आहे. तर प्रचलित भाव ११०० रुपये सुधारणा झाली आहे. उत्तर भारतातील पूर परिस्थिती नियंत्रणात येवून उत्तर भारतातील रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याने शारदीय नवरात्रोत्सवासाठी केळी मालाची होणारी वाढती मागणी पाहता केळीच्या भाववाढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.- विशाल अग्रवाल, केळी निर्यातदार, रावेर

टॅग्स :केळीमार्केट यार्डजळगावशेती