मागील महिन्यांत केळीचे भाव पडले असताना कुंभमेळा आणि आखाती देशांत मागणी वाढल्याने नांदेड जिल्ह्याची अर्धापुरी केळी आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.
सध्या आवक कमी अन् मागणी जास्त झाल्याने ८०० रुपये प्रतिक्विंटलवर असलेले केळीचे भाव थेट २१०० ते २२०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे केळीचे उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.
राज्यात जळगावनंतर नांदेड जिल्ह्यातील केळीला सर्वाधिक मागणी असते. सध्या उत्तर महाराष्ट्रात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून जळगाव, अकलूज तसेच आंध्र प्रदेश येथील केळीला २५०० ते ३ हजार रुपये भाव मिळत आहे.
याशिवाय सोलापूर येथून आखाती देशात निर्यात करण्यात येत असलेल्या केळीला तीन हजार रुपयांचा भाव आहे. तर नांदेड येथील केळी २१०० ते २२०० रुपयांवर पोहोचली आहेत. पण बाजारात आवक कमी अन् मागणी अधिक असल्याने केळी उपलब्ध होत नाहीत.
दरवर्षी १० ते १५ हजार हेक्टरवर केळीची लागवड आहे. यात सर्वाधिक लागवड ही अर्धापूर, मुदखेड, तालुक्यांत होते. शिवरात्रीला मागणी वाढून आणखी भाव वाढतील, असे केळी व्यापारी लक्ष्मणराव दुधाटे यांनी सांगितले.
आवक घटल्याने केळीचे भाव वाढले
१० गाड्या दररोज भरल्या जात आहेत. यापूर्वी नांदेडच्या मार्केटमध्ये दर दिवशी सिझनमध्ये केळीच्या दोनशे ते अडीचशे गाड्या भरल्या जात होत्या.
कुंभमेळ्यात मोठी मागणी
सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून, या ठिकाणी विविध फळांसह केळीची मागणी वाढली आहे. याशिवाय आखाती देशांतही जिल्ह्यातील केळी पाठविण्यात येत असून, तेथेही अधिकचा भाव मिळतो आहे. त्यामुळे नांदेड येथील बाजारपेठेत सध्या केळीच उपलब्ध होत नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.