Join us

Ashwagandha cultivation : वाशिम बाजार समितीने घेतला पुढकार; करणार अश्वगंधा शेतीचा प्रसार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:06 IST

Ashwagandha cultivation : शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकांकडे वळवून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत, औषधी वनस्पती असलेल्या अश्वगंधा शेतीचा (Ashwagandha cultivation) प्रसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाशिम : शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकांकडे वळवून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत, औषधी वनस्पती असलेल्या अश्वगंधा शेतीचा (Ashwagandha cultivation) प्रसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बियाणे उपलब्ध करून देण्यासह उत्पादित मालाची खरेदीही केली जाणार आहे.  (Ashwagandha cultivation) पारंपरिक पिकांना अपेक्षित भाव न मिळणे आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

या पार्श्वभुमीवर, वाशिम बाजार समितीने किनोव्हा, राजगिरा, चिया, कस्तुरी भेंडी यांसारख्या अपारंपरिक पिकांची खरेदी सुरू केली आहे. आता अश्वगंधा शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी समितीने निमज बाजार समितीचा अभ्यास केला असून, तशाच धर्तीवर नवे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  (Ashwagandha cultivation)

निमज बाजार समितीच्या धर्तीवर उपक्रम

निमज बाजार समितीत २५० ते ३०० प्रकारच्या औषधी वनस्पतींची खरेदी केली जाते आणि त्यांना चांगला बाजारभाव मिळतो. वाशिम बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बाजार समितीचा दौरा करून तेथील प्रणालीचा अभ्यास केला आहे. त्याच धर्तीवर वाशिम बाजार समितीतही अश्वगंधा शेतीचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे.

शेतकऱ्यांसाठी थेट बियाणे पुरवठा, खरेदी

ज्या शेतकऱ्यांना अश्वगंधा शेती करायची आहे, त्यांना निमज येथील व्यापाऱ्यांकडून बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल वाशिम बाजार समितीमार्फत खरेदी केला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी वाशिम बाजार समिती प्रयत्नशील आहे. निमज बाजार समितीच्या धर्तीवर अश्वगंधा शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. - महादेवराव काकडे (गुरुजी), सभापती, वाशिम बाजार समिती

शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बियाणे उपलब्धता आणि हमीभावाने खरेदी यामुळे अश्वगंधा शेतीकडे कल वाढेल. यासाठी बाजार समिती ठोस पावले उचलत आहे. - वामनराव सोळंके, सचिव, वाशिम बाजार समिती

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीवाशिमबाजार समिती वाशिम