पुणे : सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. विशेषतः पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ १० ते १५ रु. प्रति किलो महाग खरेदी करावा लागणार आहे.
पुणेकरांच्या विशेष पसंतीच्या आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २०% ने वाढून घाऊक बाजारपेठेत ८००० ते ९००० रु. प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.
मागील वर्षी हंगामाच्या सुरुवातीला हे दर ७००० ते ७५०० निघाले होते. यावर्षी साधारणतः ५०० ते १००० रुपये प्रति क्विंटलने आंबेमोहोर तांदळाची भाववाढ झाली आहे. या भाववाढीचे प्रमुख कारण म्हणजे सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने नॉन बासमती तांदळावरची निर्यात बंदी उठवली.
तसेच त्यावेळी असणारा २० टक्के निर्यात कर सुद्धा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आंबेमोहोर तांदळाला परदेशातून खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८०% तांदूळ हा मध्यप्रदेशमधून तर उर्वरित २०% तांदूळ आंध्रप्रदेश या राज्यांमधून येतो. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे.
त्याचबरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी जागेवरच अधिक प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे वरील भाववाढ झालेली आहे. साधारणतः डिसेंबर महिन्याच्या शेवटी नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते.
आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. तर महाराष्ट्रात कामशेत, भोर या भागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते. मात्र पुणे शहराचे झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनींना चांगला भाव आला म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे यंदा १० ते १५ रुपये किलोमागे मोजावे लागणार आहेत. - धवल शहा, तांदळाचे निर्यातदार.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात