Join us
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष हंगामासोबतच बेदाणा निर्मितीलाही सुरवात; बेदाण्याच्या द्राक्षांना काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:24 IST

घाटनांद्रे येथील अनेक उत्पादकांच्या बागेतील द्राक्ष मालाची विक्रीही सुरू झाली असून बाजारपेठेत विविध जातींची द्राक्षे उपलब्ध झाली आहेत.

जालिंदर शिंदेघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या द्राक्ष हंगामासोबतच बेदाणा निर्मितीचीही लगबग सुरू झाली आहे.

घाटनांद्रे येथील अनेक उत्पादकांच्या बागेतील द्राक्ष मालाची विक्रीही सुरू झाली असून बाजारपेठेत विविध जातींची द्राक्षे उपलब्ध झाली आहेत.

दर समाधानकारक मिळत असले तरी हंगामाला अपेक्षित गती अद्याप दिसून येत नाही. तालुक्यात नगदी पीक म्हणून द्राक्ष पिकाला मोठी पसंती मिळाल्याने द्राक्ष क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

यंदा मात्र मे महिन्यापर्यंत पाऊस लांबल्याने आणि त्यानंतर आवश्यक ऊन न मिळाल्याने द्राक्ष काडी परिपक्व होण्यावर परिणाम झाला. परिणामी गर्भधारणा कमी होऊन एकूण उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.

सध्या द्राक्षे विक्रीयोग्य झाली असून राज्यासह परराज्यातील व्यापारी परिसरात दाखल झाले आहेत. अनेक शेतकरी बागेमध्येच रोखीने द्राक्ष विक्री करत आहेत.

दर चांगले असले तरी उत्पादन घटल्याने उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दर चांगले असले तरी उत्पादन घटल्याने उत्पन्नावर परिणामाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विविध जातींना अपेक्षित दर (सध्याच्या बाजारभावानुसार)◼️ माणिक चमन : २७० ते ३०० रुपये.(सुपर सोनाका, बुलेट, अनुष्का, आरके)◼️ एसएसएन : ३०० ते ३५० रुपये.◼️ निर्यातक्षम दर्जा : ३५० ते ४०० रुपये.◼️ काळी द्राक्षे : ३५० ते ४५० रुपये.◼️ बेदाण्यासाठी द्राक्षे : २२५ ते २७५ रुपये.

वाढत्या खर्चाची कसरत◼️ द्राक्ष उत्पादकांचा वाहतूक खर्च, औषधे व मजुरी दर वाढल्याने उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.◼️ व्यापाऱ्यांकडून होणारी संभाव्य फसवणूक आणि बाजारातील चढ-उतार लक्षात घेता शेतकरी सावध भूमिका घेत आहेत.◼️ द्राक्ष हंगामाच्या अखेरपर्यंत द्राक्षाचे दर टिकून राहावेत आणि उत्पादन घट भरून निघावी, अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बेदाणाशेडची उभारणी◼️ द्राक्षावर प्रक्रिया करून बेदाणा निर्मितीसाठी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत कुची ते नागजमार्गे सांगोल्यापर्यंत बेदाणाशेड उभारले आहेत.◼️ थंडी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत टिकून राहिल्याने बेदाणा हंगाम काहीसा उशिरा सुरू झाला आहे.◼️ बेदाणा निर्मितीसाठी उष्ण व निर्मळ वातावरण आवश्यक असल्याने शेतकरी हवामानाकडे लक्ष ठेवून नियोजन करत आहेत.◼️ काही उत्पादक थेट बेदाणा निर्मितीकडे वळत असल्याचेही दिसते.

अधिक वाचा: २०१९ नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही आता पीएम व नमो किसानचा लाभ मिळण्याची शक्यता; निकष बदलणार?

टॅग्स :द्राक्षेबाजारशेतकरीशेतीकाढणी पश्चात तंत्रज्ञानसांगली