Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात सोयाबीनच्या २५ हजार पोत्यांची आवक, किती मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 11:00 IST

शेतकऱ्यांमध्ये नाराजी...

बीड जिल्ह्यात माजलगाव शहरातील मोंढ्यात चार दिवसांपासून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. बुधवारी २५ हजार पोत्यांची आवक झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोंढा परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. आवक वाढल्याने सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. 

यावर्षी सुरुवातीपासून पाऊस कमी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी पाणी देऊन आपली पिके जगवली असली, तरी पिकांचा दर्जा खालावला होता. शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला दहा हजारांचा भाव मिळाला होता व गेल्या वर्षी तोच भाव निम्म्यावर आला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी सोयाबीन घरीच ठेवले होते.

यावर्षी पाऊस कमी असल्याने व उत्पादनात घट झाल्याने सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असे वाटत होते. परंतु, यावर्षी चित्र उलट दिसत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीनला साडेचार हजार रुपयांपेक्षा कमी भाव देण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी सुरुवातीला सोयाबीनला आठ हजारांपर्यंतचा भाव मिळाला होता व नंतर पाच हजारांवर स्थिर झाला होता. यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे परिस्थिती होऊ नये, म्हणून शेतकरी सोयाबीनचे खळे होताच शेतातूनच विक्रीसाठी आणत आहेत. भाव कमी होण्याच्या भीतीने शेतकरी शेतात सोयाबीनचे खळे होताच तो विक्रीस आणू लागले आहेत. यामुळे मोंढ्यात सोयाबीनच्या पोत्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे मोंढ्यात सोयाबीनच्या पोत्यांची आवक दिवसेंदिवस वाढतच आहे.

हमीदरापेक्षा कमी भाव

  •  मोंढ्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहेत. सध्या हमीभाव ४ हजार ६०० आहे. 
  •  सध्या व्यापाऱ्यांकडून चार ते साडेचार हजार रुपयांनीच सोयाबीन खरेदी केले जात असताना बाजार समितीचे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे. 

एकतर्फी वाहतूक सुरु करणार !

मोंढ्यातील आवक पाहता येथे वाहनांसाठी एकतर्फी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल. -जयदत्त नरवडे, सभापती, कृउबा, माजलगाव.

मोंढ्यात चार दिवसांपासून दररोज १५-२० हजार पोत्यांची आवक येत आहे. बाजार समितीला शेतकऱ्यांकडूनच मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असून, ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे. याकडे बाजार समितीने गांभीर्याने लक्ष देऊन मोंढ्यात येणाऱ्या शेतकयांसाठी सोय केली पाहिजे.-नितीन नाईकनवरे, माजी सभापती, कृउबा माजलगाव.

टॅग्स :शेतकरीबाजारमार्केट यार्डबीड