Join us

Maize : मक्यावरील लष्करी अळीचे होणार नियंत्रण! बारामती कृषी महाविद्यालयाने केली 'रक्षा बेट'ची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 21:06 IST

मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जी रासायनिक किटकनाशके वापरण्यात येतात त्यांचा अंश मुरघासामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परिणामी दुधाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. याचाच विचार करून या विषारी रक्षा बेटची निर्मिती करण्यात आली आहे. 

Pune : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने आणि प्राध्यापकाने मिळून मक्यावरील खोड पोखरणाऱ्या लष्करी अळीवर प्रतिबंध करण्यासाठी औषधाची निर्मिती केली आहे. रक्षा बेट असं या औषधाचं नाव असून मकेच्या गाभ्यात टाकल्यानंतर लष्करी अळीचा प्रतिबंध करता येणार आहे. 

दरम्यान, मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी जी रासायनिक किटकनाशके वापरण्यात येतात त्यांचा अंश मुरघासामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परिणामी दुधाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. याचाच विचार करून या विषारी रक्षा बेटची निर्मिती करण्यात आली आहे.

महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाच्या स्वाथी या विद्यार्थिनीने आणि प्राध्यापक डॉ. सुमेधा शेजुळ पाटील यांनी मिळून वनस्पतीमधील विषारी घटक वापरून अळीला मारण्याचे संशोधन केले. त्याच घटकापासून कीटकशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी मिळून रक्षा बेटची निर्मिती केली.

लष्करी अळीमुळे मका पिकाचा पोंगा जळून जातो. पण रक्षा बेटच्या वापरामुळे या अळीवर नियंत्रण करता येते. मका पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पोंग्यामध्ये या विषारी रक्षा बेटची मात्रा सोडली तर या अळीवर नियंत्रण करता येऊ शकते असा दावा प्राध्यापकांनी केला आहे. त्यासोबतच रक्षा बेट यावर काम सुरू असल्याची माहिती बारामती कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दिली आहे. 

रक्षा बेट या विषारी औषधापासून मक्यावरील लष्करी अळीवर नियंत्रण करता येऊ शकते. या अळीच्या प्रादुर्भावामुळे मका पिकाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांनी यावर नियंत्रणासाठी वापरलेल्या केमिकल औषधांमुळे गाईच्या दुधामध्ये केमिकलचे प्रमाण आढळून येत आहे. यावर उपाय म्हणून या रक्षा बेटची निर्मिती केली असून या औषधावर अजून प्रयोग सुरू आहेत. - डॉ. अतुल गोंडे (प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, बारामती)

 या गोळीमध्ये वनस्पतीपासून मिळवलेले विषारी घटक आहेत. जे घटक थोडेसे जरी अळीच्या शरिरात गेले तरी अळी मरून जाते. याच्या वापरामुळे कोणतेही विषारी घटक शिल्लक राहत नाहीत. यामुळे मुरघास किंवा दुधामध्ये केमिकलचे प्रमाण राहणार नाही.- शरद दळवे (प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, बारामती)

टॅग्स :शेती क्षेत्रमकाशेतकरी