अतिवृष्टी आणि पुरामुळे गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील ५६ हजार ७४८ शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार मदतनिधी मंजूर करण्यात आला.
त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या 'ई. पंचनामा पोर्टल'वर अपलोड करण्याचे काम अद्याप सुरूच आहे.
१९ एप्रिलपर्यंत गेल्या महिनाभराच्या कालावधीत २६ हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून, उर्वरित ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या पावसाळ्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ५६ हजार ७०० शेतकऱ्यांचे ५७ हजार ३७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, जमीन खरडून गेल्याने ४८ शेतकऱ्यांचे ३० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले होते.
७९ कोटी ४८ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर
• जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आला.
• मदतीची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने, गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या 'ई-पंचनामा पोर्टल'वर अपलोड करण्याचे काम सुरू असून, जिल्ह्यातील ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम अद्याप बाकी असल्याचे चित्र आहे.
याद्या 'अपलोड'चे काम पूर्ण होणार केव्हा ?
• गेल्या १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले.
• १६ एप्रिलपर्यंत गेल्या महिनाभरात २६ हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
• जिल्ह्यातील ३० हजार ७४८ २ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होणे अद्याप बाकी असल्याने, संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी