Join us

पीक कापणीचा प्रयोग का करतात? त्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ होतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 1:43 PM

पिकांच्या उत्पादनाची आकडेवारी राज्य सरकार तसेच केंद्र शासनास अनेक मुलभूत आणि धोरणात्मक बाबींसाठी आवश्यक असते. महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांच्या उत्पादनाचा अंदाज अंतिम करण्यासाठी सन १९४४-४५ सालापासून पीक कापणी प्रयोग राबविण्यात येतात. 

पीक कापणी प्रयोगातील सरासरी उत्पादनाच्या प्राप्त आकडेवारीचा उपयोग राज्य व जिल्हा पातळीवरील निरनिराळ्या पिकांच्या दर हेक्टरी सरासरी उत्पादनाचा विश्वासार्ह अंदाज काढणे, कृषी मालाच्या उत्पादनाबरोबरच कृषी उत्पादनाची खरेदी, आयात निर्यात धोरण, किमान आधारभूत किंमत इत्यादी अनेक बाबींवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी करण्यात येतो. 

पैसेवारी व पिकविम्यासाठी उपयोगयाशिवाय पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर 5 वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पादनाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात येते. याशिवाय पिक विमा योजनेच्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा सदर आकडेवारीचा उपयोग करण्यात येतो.

महसूल विभागाकडून पैसेवारी ठरविण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय स्वतंत्र प्रमुख पिकाचे 6 पिक कापणी प्रयोग घेण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये एकुण ग्रामपंचायतींची संख्या २८२४० असुन प्रति ग्रामपंचायत सहा (6) प्रमाणे एका मुख्य पिकाकरिता एकुण 1,69,440 एवढे पिक कापणी प्रयोग हे मंडळाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागामार्फत घेतले जातात. 

पिक सर्वेक्षण योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामाकरिता सर्वसाधारणपणे 90,000 ते 1,20,0000 इतके पिक कापणी प्रयोग घेतले जातात. 

सर्व समावेशषक पीक कापणीचा प्रयोगराज्यात पीक पैसेवारी, पिक विमा, पिक उत्पादनाचे आकडेवारी निर्धारित करणे अशा विविध बाबींसाठी घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगांची संख्या ही जवळपास 3 लाख प्रयोग पर्यन्त असल्याने महसूल ग्रामविकास, कृषी विभागावर अल्पावधीत हे प्रयोग पूर्ण करण्याची असलेली जबाबदारी व प्रयोगाची गुणवत्ता या बाबीचा विचार घेऊन एकाच पद्धतीचे पीक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त आकडेवारीचा वापर पिक विमा, पीक उत्पादनाचे आकडेवारी, पीक पैसेवारी इत्यादी अनुषंगिक बाबींकरिता करण्यात येत आहे. यासाठी मागच्या तीन वर्षांपासून सर्वसमावेशक पीक कापणी प्रयोग कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.

पिक कापणी प्रयोगासाठी गावांची निवड कशी करतात?१ गावांची यादी तयार करणे : केंद्र शासनाच्या पिकाचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना (Timely Reporting of the Agricultural Intelligence) अंतर्गत दरवर्षी मंडळातील एकूण गावांपैकी 20 टक्के रॅण्डम पदधतीने निवडली जातात. मंडळातील सर्व गावांची 5 वर्षात निवड केली जाते. निवडलेल्या गावात गतवर्षी घेण्यात आलेल्या पिकांची माहिती संबंधित मंडळ अधिकारी यांच्याकडून घेण्यात येते. मंडळ अधिकारी यांच्याकडून प्राप्त यादीवरुन जिल्हास्तरीय प्रशिक्षणाच्या वेळी गावांची अंतिम यादी निश्चित करण्यात येते.

२. पिक कापणी प्रयोगासाठी निवडलेली गावे क्षेत्रीय कर्मचा-यांना कळविली जातात : पिक कापणी प्रयोगासाठी निवडलेली अंतिम गावे जिल्हास्तरीय पिक कापणी सनियंत्रण समितीने तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्यामार्फत क्षेत्रीय कर्मचारी यांना कळविण्यात येतात.पीक सर्वेक्षण, प्रधानमंत्री पिक विमा योजना व पैसेवारीसाठी अशी असते प्रयोगाची संख्या :पैसेवारी ठरविण्याकरिता राजस्व निरीक्षक अथवा तत्सम अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतवार प्रत्येक प्रमुख पिकांचे किमान 6 पिक कापणी प्रयोग घेण्यात येतात व प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत महसूल मंडळ/मंडळ गटस्तरावर 12 व तालुकास्तरावर 18 पिक कापणी प्रयोग घेण्यात येतात. तसेच, विमा अधिसूचित नसलेल्या पिकांसाठी संबंधीत जिल्हयातील पेरणी क्षेत्र 80,000 हे. हून अधिक असल्यास १५० प्रयोग, सदर क्षेत्र २०,००० ते ८०,००० हे. दरम्यान असल्यास १२० प्रयोग व ते क्षेत्र २०,००० हे. पेक्षा कमी असल्यास ८० प्रयोग घेण्यात येतात.सद्यस्थितीमध्ये बहुतांश पिकाकरीता पीकविमा अधिसूचित क्षेत्र महसूल मंडळ आहे. त्यानुसार पिक कापणी प्रयोगाचे नियोजन केले जाते. जर एखाद्या महसूल मंडळ मध्ये विहित पीक कापणी प्रयोग काही अपरिहार्य कारणास्तव होऊ शकले नाहीत तर त्या महसूल मंडळातील पीक उत्पादन आकडेवारी साठी नजीकच्या अधिक साधर्म्य असलेल्या महसूल मंडळातील आकडेवारी गृहीत धरण्यात येते. हे अधिक साधर्म्य असलेले महसूल मंडळ ठरवण्याची जबाबदारी संबंधित तालुका स्तरीय समितीची असते.क्षेत्रिय स्तरावर पिक कापणी प्रयोगाचे नियोजन करताना महसूल मंडळ वा महसूल मंडळ गटस्तरावर अपेक्षित नियोजित प्रयोगांपेक्षा अधिकच्या पिक कापणी प्रयोगांचे ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्याचे संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. 

टॅग्स :पीक विमालागवड, मशागतखरीपरब्बीशेतकरीशेती