Join us

उन्हाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या सविस्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:06 IST

उन्हाळ्यात सापांना पुरेशी ऊर्जा मिळत असल्याने आणि त्यांच्या चयापचयाला चालना मिळत असल्याने ते अतिक्रियाशील होतात. ते शिकाराच्या शोधात बाहेर पडतात आणि पुनरुत्पादनदेखील करतात.

उन्हाळ्यात सापांना पुरेशी ऊर्जा मिळत असल्याने आणि त्यांच्या चयापचयाला चालना मिळत असल्याने ते अतिक्रियाशील होतात. ते शिकाराच्या शोधात बाहेर पडतात आणि पुनरुत्पादनदेखील करतात.

त्यामुळेच तापमानात वाढ झाल्यामुळे थंड ठिकाणांच्या शोधात साप बिळांमधून बाहेर पडतात आणि निवासी भागाच्या आसपास दिसू लागतात; त्यामुळे स्वतः साप पकडायला जाऊ नका. वनविभागाची मान्यता असलेल्याच सर्पतज्ज्ञांना बोलवा.

उष्णता वाढल्याने साप बाहेर◼️ साप हा 'थंड रक्ताचा' प्राणी आहे. ते स्वतःच्या शरीराचे तापमान राखू शकत नाहीत.◼️ तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तापमान वाढलं की सापाचं शरीरही तापू लागते, त्यामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.◼️ सर्पदंशाच्या घटना आणि आकडेवारीवर नजर टाकली तर बहुतेक घटना या एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यानच घडतात.◼️ ग्रामीण भागात साप चावण्याच्या घटना ८० टक्के घडतात.◼️ उन्हाळ्यात दैनंदिन तापमानात प्रत्येक अंश सेल्सिअस वाढ झाल्यास साप चावण्याची शक्यता ६ टक्के वाढते.

प्रत्येक साप विषारी नसतो◼️ कोल्हापूर जिल्ह्यात सापाच्या सुमारे २५ हून अधिक प्रजाती आढळतात. मात्र, यातील प्रत्येक साप विषारी नसतो.◼️ अजगर, धामण, डुरक्या घोणस, मांडूळ, कुकरी, कवड्या, गवत्या, बार्ड कवड्या पिवळ्या ठिपक्याचा कवड्या, धूळनागीण, चित्रांगनायकुळ, तस्कर, मृदुकाय, विरोळा, काळतोंड्या हे बिनविषारी साप जिल्ह्यात आहेत.◼️ सापांच्या प्रजातीमध्ये सहा प्रकारचे साप विषारी आहेत. यात नाग, घोणस, फुरसे, मण्यार, मलबारी चापदा आणि बांबू चापदा या प्रजातींचे साप विषारी आहेत, त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे.

शहरात तसेच गावालगत सरपटणारे प्राणी उष्णतेमुळे लोकवस्तीकडे वळतात. थंड निवाऱ्याच्या शोधात अनेकदा नागरिकांच्या घरामध्ये शिरकाव करतात.

सध्या असे प्रकार वाढले असून, सर्पमित्रांकडून सापांना जीवनदान देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. साप दिसल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधावा. विषारींसह बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात आहेत. ओलावा असलेल्या ठिकाणी ते दडून असतात. 

लोकांमध्ये सांपाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. त्यातूनच लोक साप दिसला की घाबरतात किंवा सापांना मारतात. यावर जनजागृती होणे गरजेचे आहे. यूट्यूब पाहून साप पकडण्याचे धाडस अनेकजण करतात. अशा प्रकारे जीव धोक्यात घालू नका.

उष्णतेच्या महिन्यात काही प्रजातींचा मिलनाचा कालावधी असतो. अशावेळी घाबरून जाऊन मारण्याचा प्रयत्न करू नये. सापांना पकडण्याचा किंवा छेडछाड करण्याचे प्रकार टाळावे. अधिक लोकांचा घोळका करून सापाजवळ जाऊ नये.

अधिक वाचा: शेतकऱ्यांना शेतात घर बांधण्यासाठी शेतजमीन एनए करून देणार; तहसीलदारांची नोटीस

टॅग्स :सापतापमानजंगलवनविभागशेतीहवामान अंदाज