Pune : मागील काही महिन्यांमध्ये गुणनियंत्रण विभागातील भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे प्रकाशझोतात आलेल्या कृषी विभागातील संचालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संचालकांच्या पदस्थापनेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागासाठी नवे संचालक नेमण्यात आले आहेत. याआधी मलईदार विभाग समजल्या जाणाऱ्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक होण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ होत होती.
दरम्यान, राज्याचे आत्मा संचालक अशोक किरन्नळी यांच्याकडे आता राज्याचे सर्वांत महत्त्वाचे असलेल्या निविष्ठा व गुणनियंत्रणच्या संचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यासोबतच किरन्नळी यांना फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर फलोत्पादन संचालकपदी अकोला येथील महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे संचालक असलेले अंकुश माने यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. तर माने यांना कृषी अभियांत्रिकी संचलनालयाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
सध्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या सुनिल बोरकर यांची पुन्हा मृदसंधारणच्या कृषी सहसंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर आत्मा संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर विस्तार व प्रशिक्षण संचालक असलेल्या रफिक नाईकवाडी यांना विस्तार व प्रशिक्षणच्या कृषी सहसंचालक पदावर पुन्हा नियुक्त करण्यात आले असून त्याच विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सध्या लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला येथील संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर आत्मा आणि विस्तार व प्रशिक्षण या दोन्ही विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सुनिल बोरकर आणि रफिक नाईकवाडी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पण या विभागाला अजूनही पूर्णवेळ संचालक नेमण्यात आलेले नाहीत. या विभागालाही पूर्णवेळ संचालक नेमण्यात यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर संचालकांची आणि गुणनियंत्रणमधील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या मागणीला जोर वाढला होता. तर गैरव्यवहाराच्या प्राथमिक चौकशी अहवालानंतरही गुणनियंत्रण विभागातील अधिकारी किरण जाधव यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सचिवापर्यंत गेले होते. या सर्व घडामोडीनंतर या बदल्या करण्यात आल्या आहेत.