Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीला केवळ ५ ते ७ बोंडे; उत्पादन घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 11:53 IST

पावसाच्या सातत्यात खंड पडल्याने कपाशीची वाढ खुंटली असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कापसाकडे बघितले जात असले तरी, दिवसेंदिवस पीक पद्धतीत बदल झाल्याने कपाशीचे क्षेत्र घटत चाललेले आहे.अशातच या पिकाला अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

यावर्षी पाऊस उशिरा झाला त्यामुळे खरिपाच्या पेरणी जून महिन्याच्या शेवट तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पेरणी झाली. जिल्ह्यात जवळपास ३९ हजार ८९७ हेक्टरवर कापूस पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु पाऊस झाल्यानंतर मध्यंतरी मोठा खंड पडल्याने कापसाची पावसाअभावी वाढ खुंटली.

पाच-सहा फूट वाढणारा कापूस यावर्षी मात्र दोन अडीच फुटावरच थांबल्याने व कापसाला पाच सात बोंडे आल्याने कापसाचे हेक्टरी उत्पादन कमी होणार असून कोरडवाहू क्षेत्रावर मात्र एकरी उत्पादन अडीच तीन क्विंटलवर येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांच्या उत्पादनात मात्र वाढ होऊ शकते पण, सरासरी  कापसाच्या उत्पादनात घट येणार असून त्यातून  खर्च देखील वसूल होणार नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.

दर सात हजारांवर स्थिरावलायावर्षी पाऊस उशिरा झाल्याने महिन्याच्या सुरुवातीला कपाशीची लागवड झाली. पाऊस उशिरा झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला फाटा देऊन मका सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. कपाशीची लागवड उशिरा झाल्याने यावर्षी त्याचा तोडा ही उशिरा होणार असून दसऱ्यानंतर कापूस वेचणीला सुरुवात होणार आहे.सध्या सात हजार रुपयांच्या आसपास कापसाला भाव असून मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापूस भाव वाढीच्या अशाने घरात कापूस साठवून ठेवला होता. पण बाजारभावामध्ये सुधारणा मात्र झाली नाही.कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर कपाशीवर लाल्या आणि करपा रोग आल्याने त्याचा फटका ही बसणार आहे.

अशी आहे कपाशीची स्थिती नाशिक जिल्ह्यात जवळपास ३९,८९७ हेक्टरवर कापूस पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली.■ कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव■ कोरडवाहू कापसाची परिस्थिती मात्र चिंताजनक ■ एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये कापसाला खर्च येतो व यावर्षी मात्र या कापसातून शेतकयांचा खर्च देखील वसूल होणार नाही अशी परिस्थिती आहे.■ सर्वात जास्त कापूस लागवड मालेगाव, नांदगाव, तर कळवण, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, पेठ, इगतपुरी या तालुक्यांमध्ये कापूस लागवड शून्यावर आहे.

मी या वर्षी तीन एकरावर कपाशीची लागवड केली, अगोदरच कपाशी लागवडीला उशीर झाला होता पण लागवड केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्याने कपाशीची वाढ खुंटून गेली. परिणामी कपाशी दोन अडीच फुटावरच थांबली. झाडावर चार-पाच बोंडे असल्याने त्यातून खर्चही निघणार नाही.- नामदेव जानराव, कापूस उत्पादक, देवठाण

टॅग्स :कापूसनाशिकशेतकरी