प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीकविमा, पीककर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य केला आहे. मात्र, 'ॲग्रीस्टॅक' योजनेंतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमास शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प आहे.
कृषी विभागाच्या २६ जानेवारीच्या अहवालानुसार, राज्यातील १ कोटी ५२ लाख ८५ हजार ४३९ खातेधारकांपैकी केवळ ५.३४ लाख (३.४८%) शेतकऱ्यांनीच 'फार्मर आयडी' प्राप्त केला आहे.
ज्यात अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक २३,११५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर अकोला जिल्ह्यात ही संख्या केवळ ५,९४८ आहे.
'फार्मर आयडी' नसलेल्या शेतकऱ्यांना भविष्यात शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येते आहे.
शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन
शासकीय योजनांचा लाभमिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने 'फार्मर आयडी'साठी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करावी.
आवश्यक कागदपत्रे
• शेतकऱ्यांनी आपला ७/१२ उतारा आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
• त्यासाठी आधारकार्ड, बैंक खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक, ७/१२ उतारा किंवा नमुना ८ या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
• शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे जवळच्या नागरी सुविधा केंद्रात सादर करून नोंदणी करावी.
बीड, जळगाव आघाडीवर
सदरील योजना प्रथम बीड जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवली गेली. सध्या बीडमध्ये सर्वाधिक १.६३ लाख, जळगावात ६७,६८४, अमरावतीत १४,१४४ शेतकऱ्यांनी 'फार्मर आयडी' मिळवला आहे.
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी