Join us

सोयगाव परिसरात विहिरींनी गाठला हिवाळ्यातच तळ; पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:39 IST

Water Shortage : सोयगाव शहरासह विहिरी आणि कूपनलिकांनी हिवाळ्यातच तळ गाठल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. शिवाय, मका, ज्वारी आदी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहरासह विहिरी आणि कूपनलिकांनी हिवाळ्यातच तळ गाठल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. शिवाय, मका, ज्वारी आदी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सोयगाव तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि परतीच्या पावसामुळे अनेक विहिरींची पातळी ऑक्टोबर अखेर पर्यंत टिकून होती. मात्र, रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर केवळ अडीच महिन्यांत विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच अनेक कूपनलिकाही ऐन हिवाळ्यातच आटण्यास सुरुवात झाली आहे.

महिनाभरापूर्वी सहा ते सात तास वीज पंपाने पाणी उपसल्या जाणाऱ्या विहिरींमधून आता दोन तासही पाणी उपसता येत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या स्थितीमुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.

परिणामी, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, तसेच शासनाने पाणीटंचाईच्या दृष्टीने विविध उपायोजना करण्याची आवश्यकता असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

रब्बीच्या क्षेत्रात झाली वाढ

• तालुक्यात यंदा रब्बी हंगामाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने मका, ज्वारी, हरभरा या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढले आहे.

• मक्याची पेरणी २ हजार ९१ हेक्टरवर, तर ज्वारीची पेरणी १ हजार ३८ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. ज्याचा परिणाम भूजल पातळीवर दिसून येत आहे.

असे आहे तालुक्यात लागवडी खालील क्षेत्र 

२ हजार ९१ हेक्टरवर मक्याची तर १ हजार ३८ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची तालुक्यात पेरणी झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस

• सोयगाव तालुक्यात जून महिन्यात २०२४ मध्ये सरासरी १४१.०८ मिमी पाऊस झाला, तसेच जुलै महिन्यात १८९ मिमी, तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २१३.७० मिमी पावसाची नोंद झाली.

• सप्टेंबर महिन्यात तालुक्यात सरासरी १५२ मिमी पावसाची महसूल विभागाकडे नोंद झाली. एवढा पाऊस होऊनही तालुक्यात आता टंचाईसदृश परिस्थिती दिसून येत आहे. परिणामी, भविष्यात तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Success Story : धनंजयरावांच्या कष्टाचे झाले सोने; एक एकर पत्ताकोबीतून अडीच लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीकपातशेतीशेतकरीछत्रपती संभाजीनगर