Join us

Watermelon Crop : हवामान बदलामुळे टरबूज पीक संकटात; यंदा उत्पादन खर्च वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:21 IST

सध्याच्या अस्थिर हवामानामुळे टरबूज (कलिंगड) पिकांवर मोठा परिणाम होत फळधारणेवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात टरबूज (कलिंगड) लागवड केली आहे. मात्र, सध्याच्या अस्थिर हवामानामुळे या पिकांवर मोठा परिणाम होत फळधारणेवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

मागील पाच वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू, हरभरा, मका आणि ज्वारी या रब्बी पिकांनी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन दिले नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करत शेतकरी केळी, टरबूज आणि खरबूज यासारख्या पिकांकडे वळले. मात्र, अधूनमधून निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे वाढ खुंटल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

या परिस्थितीत पिकांचे आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांना आठवडचातूनच पंप पाठीवर घेऊन कीटकनाशक, पीकवर्धक आणि बुरशीनाशक फवारणी करावी लागत  आहे. सामान्यतः नैसर्गिक वातावरण पोषक असताना १५ दिवसांतून एकदा फवारणी पुरेशी ठरत होती.

सध्याच्या बदलत्या हवामानामुळे आठवड्याच्या आतच फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत आहे. याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

टरबुजाला ३५० रुपये दर

• ३०० ते ३५० रूपये टरबुजाला प्रतिक्विंटल दर बाजारात मिळत आहे.

• या पिकाव्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने वडगाव वान परिसरात रब्बी हंगामात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते.

• गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे.

खरीप हंगामात सततच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनात घट झाली. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाची लागवड केली आहे; परंतु अस्थिर हवामानामुळे टरबूज खराब होत आहे. त्यावर फवारणीसाठी मोठा खर्च होत आहे. - उत्तम गवळे, शेतकरी, जरंडी.

हेही वाचा : Farmer Success Story : आधुनिक शेती तंत्रज्ञानाने साधली प्रगती; गोपालरावांची ८ एकरात ४८ लाखांची कमाई

टॅग्स :शेतीपीकशेतकरीबाजारफळेशेती क्षेत्र