Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या उष्ण झळा, हंडाभर पाण्यासाठी उन्हात महिलांची पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 16:30 IST

वाड्या, वस्त्यांना मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील महिलांना भरउन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई सुरू होते. पाणीटंचाईच्या झळा आता गेवराई तालुक्याला बसताना दिसून येत आहे. वाड्या, वस्त्यांना मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील महिलांना भरउन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते. गावात पाणी नसल्यामुळे अनेक कुटुंबीय शेतात स्थलांतर करत आहेत.

गेवराई तालुक्यातील निपाणी, जवळका, पाचेगाव, खांडवी, तळेवाडी, रांजणी, पाडळसिंगी, गढी, मादळमोही आदी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गावे डोंगराळ भागात असल्यामुळे त्यांना अनेक वर्षापासून उन्हाळा लागला की, पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

गेवराई तालुक्यातील आंबू नाईक तांड्यावरील महिलांना दीड किलोमीटर पायपीट करत हंडाभर पाणी आणावे लागते. गावात पाणी नसल्याने ग्रामस्थ एक किलोमीटर पायपीट करून डोंगरदऱ्यातील विहिरीतून पाणी आणतात. विशेष म्हणजे यासाठीदेखील जीवघेणी कसरत करावी लागते. दरम्यान, गावात पाणी उपलब्ध नसल्याने विहिरीतील पाणी शेंदून आणावे लागते. गावात टँकर सुरू करावे, अशी मागणी अंबुनाईक तांडा येथील बाबासाहेब आडे यांनी केली. दरम्यान, खांडवी ग्रामपंचायत अंतर्गत चार तांड्यांचा समावेश ग्रामपंचायतमध्ये आहे. गावामध्ये एक टैंकर येत होते. परंतु, चार दिवसांपासून येत नाही. गावामध्ये पाण्याचा गंभीर बनला असून पाच टँकर सुरू करावे, अशी मागणी खांडवी येथील सरपंच गोपाळ शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :पाणी टंचाईपाणीकपातबीड