Join us

पशुवैद्यकसह संस्थांनी प्रजनन अधिनियमांतर्गत नोंदणी करा; पशुसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 19:29 IST

भारत देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला तरी प्रगत देशाच्या तुलनेत प्रति जनावर दुग्ध उत्पादन खूपच कमी आहे. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुपालकांना उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा, भ्रूण उपलब्ध होणे आवश्यक आहे.

भारत देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला तरी प्रगत देशाच्या तुलनेत प्रति जनावर दुग्ध उत्पादन खूपच कमी आहे. त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुपालकांना उच्च प्रतीच्या वीर्य मात्रा, भ्रूण उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित संस्था व पशुवैद्यकांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियमांतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.

उपायुक्तांच्या स्तरावर होणाऱ्या दैनंदिन कामकाजासाठी जिल्हा मुख्यालयात जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र या ठिकाणी सहायक आयुक्त पशुसंवर्धन हे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे. अहिल्यानगरमध्ये डॉ. अरुण हरिश्चंद्रे नुकतेच या पदावर रुजू झाले आहेत, अशी माहिती डॉ. उमेश पाटील यांनी दिली. यावेळी सहायक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, डॉ. संतोष पालवे उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले की, या अधिनियमनाच्या अंमलबजावणीसाठी गोजातीय प्रजनन कामांमध्ये सहभागी प्रत्येक घटक जसे की रेत केंद्र, भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था, सहयोगी जनन तंत्रज्ञ सेवा पुरवठादार, सहयोगी जनन तंत्रज्ञ संस्था, रेत बँक, कृत्रिम रेतन सेवा पुरवठाकार, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ अशा सर्वानी तत्काळ आवश्यक त्या नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज करून नोंदणी करावी.

पुणे येथे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन उच्च दूध उत्पादनासाठी जनुकीयदृष्ट्या सुधारित गोवंश निर्माण करणे, वीर्य व भ्रूण उत्पादन करण्यासाठी रोगमुक्त, गुणवत्तापूर्ण वळूचा वापर सुनिश्चित करणे, वीर्य व भ्रूण उत्पादन, विक्रीकर नियंत्रण, कृत्रिम रेतन प्रक्रियेचे शास्त्रीय नियमन व प्रजनन कार्य करणाऱ्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे असे विविध उद्देश या नियमनाचे आहेत.

रेत केंद्र, भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था, सहयोगी जनन तंत्रज्ञ सेवा पुरवठादार, सहयोगी जनन तंत्रज्ञ संस्था यांना पुणे येथील आयुक्तालयातील प्राधिकारणामध्ये नोंदणी करावी लागणार आहे.

सर्वसामान्य पशुपालकांच्या हिताचा हा निर्णय असल्याने सर्व संबंधित घटकांनी या अधिनियमच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे. - डॉ. उमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अहिल्यानगर.

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतीशेती क्षेत्रसरकार