दक्षिण भारतासाठी स्वतंत्र साखर संशोधन संस्था असावी या मागणीसाठी भारत सरकारने १९६५ मध्ये पी.आर. रामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमली होती. त्या वेळचे विद्यमान सहकार मंत्री मा.यशवंतराव मोहिते यांच्या सूचनेनुसार साखर संचालनालयाची स्थापना नोव्हेंबर १९७१ रोजी करून त्याचे मुख्यालय पुणे येथे स्थापन केले. त्यांनी शुगर इंडस्ट्री ऑफ महाराष्ट्र: ब्ल्यू प्रिंट फॉर प्रोग्रेस (१९७४) या पुस्तकातून साखर उद्योगाची भविष्यकाळातील दिशा, साखरे व्यतिरिक्त उपपदार्थांविषयी त्याचबरोबर ऊस विकास धोरण व त्या अनुषंगाने कित्येक बाबी वरती सखोल अशी चर्चा केली आहे, त्यामुळे वसंतदादांबरोबर यशवंतराव मोहिते व इतर मान्यवरांनी दक्षिण भारतासाठी स्वतंत्र ऊस संशोधन संस्थेची गरज असल्याचे केंद्र शासनास निदर्शनास आणून दिले.
त्या पार्श्वभूमीवर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० व सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट १८६० या दोन स्वतंत्र कायद्याद्वारे डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट असे नाव ठेवून नोंदणी १९ नोव्हेंबर १९७५ रोजी केली. या संस्थेचे पहिले विश्वस्त मंडळ वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे व शंकररावजी कोल्हे हे होते. या संस्थेस साखर कारखान्याकडून प्रति टन एक रुपया फंड देण्याचे घोषित केले. प्रकल्पाचे संचालक म्हणून नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट चे माझी संचालक एस. एन. गुंडुराव यांची नियुक्ती केली.
वसंतदादांच्या अकस्मिक निधनानंतर (१ मार्च १९८९) शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचे नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष म्हणून आजतागायत यशस्वी रित्या धुरा सांभाळून संस्थेला जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिले. २०२५ हे वर्ष व्ही. एस. आय. चे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्त दादांच्या ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारीला दिशादर्शक ठरणारी संस्था, (व्ही. एस. आय., मांजरी (बु), पुणे), सहकार क्षेञ व इतर बहुआयामी विकास कार्याची दखल घेणे अगत्याचे ठरते, त्यामुळे दादांच्या विकास कार्याचा हा लेखाजोखा मांडण्याचा अल्पसा प्रयत्न.
वसंतदादांनी कृष्णा नदीवर घाट बांधण्याचे पहिले सार्वजनिक काम पुर्ण केले. तसेच गरीब भगिनींना सावकाराच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. अशाप्रकारे त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवन प्रवासाची सुरुवात झाली. १९३७ ला तालुका सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड झाली.
मुंबई सरकारच्या शिफारशीवरून सातारा जिल्ह्याचे उत्तर सातारा व दक्षिण सातारा म्हणजे सांगली असे विभाजन झाले व १५ ऑगस्ट १९४९ रोजी दोन जिल्हे अस्तित्वात आले. त्याचदरम्यान होमगार्ड कमांडंट म्हणून दादांची निवड झाली. १९६१ मध्ये होमगार्ड संघटनेच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी माजी सरसेनापती जनरल करिअप्पा यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यमापन समिती नेमण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी दादांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. दक्षिण सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामानंद भारती व सेक्रेटरी म्हणून वसंत दादा काम पाहत होते.
अल्पबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी सांगलीला नॅशनल स्मॉल सेविंगचे अधिवेशन दादांनी भरवले, त्याचबरोबर ग्राम सुधार सप्ताह, श्रमदानाची कामे करून दहा लाख मूल्यांकनाची कामे त्यांनी केली. धान्य लेव्हीचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बक्षीस मिळालेल्या रकमेतून महात्मा गांधी वस्तीगृहाची निर्मिती केली.
वसंतदादांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे दादा अध्यक्ष होते. त्यांनी शेतीच्या पाण्यासाठी वारणा प्रोजेक्ट तसेच कवठेमहांकाळ जवळ वज्रचौडे धरणाचे काम, मिरज लातूर ब्राँडगेज यासाठी रेल्वेमंत्री लालबहादूर देसाई यांना रेल्वे परिषद उद्घाटनास बोलवले होते. त्याचबरोबर गांधी जयंती निमित्त ग्रामसुधार सप्ताह अशा कित्येक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सांगली परिसराचा विकास केला.
शेतकरी सहकारी साखर कारखाना, माधवनगर व नियंत्रित बाजारपेठ याची स्थापना त्यांनी केली. दी एग्रीकल्चरल प्रोडूस मार्केट कमिटी, सांगलीस स्थापना केली. मार्केट यार्डास सांगलीच्या पूर्वेस १०१ एकर जागा संपादित करून घेतली. सांगलीच्या स्पाइसेस अँड आँईल सीड एक्सचेंज लिमिटेड या संस्थेस हळद वायदे बाजारास परवानगी मिळवून दिली. मार्केट कमिटीस इन्कम टॅक्स कायद्यातून सूट मिळवून दिली. युनोचे एफ ए ओ सल्लागार अँबेट यांनी सांगली कमिटीस दिनांक ८ फेब्रुवारी १९६८ रोजी भेट देऊन दादांच्या कार्याचा गौरव केला.
मुंबई राज्य सहकारी साखर कारखाना संघाची स्थापना दादांच्या पुढाकाराने झाली व त्यांचे पहिले अध्यक्ष धनंजय गाडगीळ होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथे सहकारी औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. नदीवर हात पंप बसवून शेतीस पाणीपुरवठा योजना सहकारी तत्त्वावरती राबविली, त्याचबरोबर लिफ्ट इरिगेशन स्कीम, विहिरी खोदल्या व त्यावरती इंजिने बसवली. मिरज येथे मेडिकल कॉलेजची स्थापना त्यांनी केली. साखर कारखान्यांना पूरक उद्योगाची माहिती हवी या उद्देशाने नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्या विद्यमानाने सांगली येथे १९६३ ला दादांनी परिषद आयोजित केली. मळीपासून अल्कोहोल तयार करण्याच्या डिस्टिलरी उत्पादन १० जुलै १९६४ पासून सुरू झाले.
पूरक उद्योगासाठी सांगली कोंबडी सहकारी संघ १९६४ ला व बगॅस पासून लिहिण्याचा व छपाईचा कागद तयार करण्यासाठी लंडन येथे २५ सप्टेंबर १९६४ ला अभ्यास दौरा केला. वॉशिंग्टन येथे अमेरिकेच्या फेडरल गव्हर्मेंट प्रमुख शेती अधिकाऱ्याशी कृषी औद्योगिक विकासाबद्दल चर्चा, मँचेस्टर येथे साँमन हँडलिंग कागद कारखान्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट करून देणारी ब्रिटिश फर्म यांच्या मुख्याशी चर्चा करून त्या अनुषंगाने आपल्या भागामध्ये विविध उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न केले. स्पिनिंग मिल सहकारी संस्था १० एप्रिल १९६६ रोजी स्थापना, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह फर्टीलायझर अँड केमिकलची जपानच्या तांत्रिक सहकार्याने १९६६ रोजी स्थापना, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह इंजिनिअर सोसायटी कोल्हापूर ५ सप्टेंबर १९६६ ला स्थापना (त्यातून शेतकऱ्यांना लागणारी शेती अवजारे यांत्रिक उपकरणे व सुट्टे भाग पुरवठा होण्यासाठी). बंगळूरू येथे डिसेंबर १९६६ मध्ये इंटरनॅशनल कॉपरेटिव्ह अलायन्स लंडन या सहकारी संस्थेने परिसंवाद आयोजित केला व तेथून सांगली कारखाना व जलसिंचन योजनेस भेट दिली व त्याद्वारे दादांच्या विकास कार्याचा गौरव जगभर पसरला.
जुलै १९७१ मध्ये पशु व कोंबडी खाद्य कारखाना स्थापन केला. मार्च १९७२ ला वसंत दादा महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री झाले त्यावेळेस ते ६८ संस्थांचे काम पाहत होते. बागायती बारा महिने पाणीपुरवठा ही कल्पना बदलून आठ माही पाणीपुरवठा म्हणजे बागायती अशी सुधारणा केली. खुजगाव ऐवजी चांदोली धरणाचा निर्णय त्यांच्याच काळात झाला. कृष्णा, गोदावरी व नर्मदा पाणी तंटा लवाद स्थापन करून कृष्णा पाणी तंटा लवाद निर्णय २४ डिसेंबर १९७३ ला निवाडा होऊन व त्यास महाराष्ट्र शासनाचे मान्यता मिळाली. कृष्णेच्या एकूण २०६० टीएमसी पैकी ५६५ टीएमसी महाराष्ट्र, ६९५ कर्नाटक व ८०० टीएमसी आंध्र प्रदेश यांना मिळाले.
शंकराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वसंतदादांकडे पाटबंधारे, दारूबंदी व उत्पादन शुल्क खाते होते. गोदावरी पाणी तंटा ६ ऑक्टोबर १९७५ ला वाद संपुष्टात आला. त्यांच दूरदृष्टीने साखर कारखान्यास लागणाऱ्या मशनरी तयार करण्याचा नॅशनल को-ऑपरेटिव्ह हेवी इंजिनिअरिंग हा कारखाना तळेगाव येथे सुरू केला.
१३ नोव्हेंबर १९६६ रोजी दादांनी ५० व्या वर्षात पदार्पण केले. पद्मभूषण, ताम्रपट व स्वातंत्र्य युद्धातील छातीवरील जखम ही त्यांच्या मानाची निशाणी. त्यांच्या साठाव्या वयाच्या अभिष्टचिंतन मिरवणुक एक मैल लांब व त्यामध्ये ५० पथके, ५०० ट्रक व ७० हजार लोक सामील झाले होते ही त्यांच्या विकास कार्याला मानवंदना होती.
दरम्यान, १९७२ ते ७७ पर्यंत ते नॅशनल फेडरेशन ऑफ कॉपरेटिव शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष होते. १७ एप्रिल १९७७ ला महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी हंगामी राज्यपाल आर.एम. कातावाल यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर त्यांनी लगेच शेतकऱ्यांच्या थकबाक्या रद्द केल्या. कोयना धरणग्रस्तांची कर्जे माफ केली (१५०० रुपये पेक्षा कमी कर्ज). जनतेचा राग कधीही कायमचा नसतो सेवाभावानेच राग घालवता येतो अशी त्यांची भावना होती. दादांच्या जीवनातील पाच मुख्य प्रेरणा मुल्ये होती यामध्ये प्रथम ते स्वातंत्र्य सैनिक, दुसरे होमगार्ड कमांडंट, तिसरे राजकीय कार्यकर्ता व सहकारी क्षेत्रातील जाणकार, चौथे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व पाचवे मुख्यमंत्री.
पुणे डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट च्या तिसऱ्या वार्षिक सभेत त्यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली होती. त्यानंतर बोट क्लब मैदानावर दिल्लीमध्ये किसान मेळाव्याचे आयोजनाची जबाबदारी दादांवर दिली यातून दादांचे संघटन व कार्यक्रमाचे काटेकोर आयोजनाचे कौशल्य दिसून येते. ऊसापासून पाँवर अल्कोहोल व त्याचा वाहनासाठी इंधन म्हणून उपयोग करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दादांनी त्यावेळेस सुचवले होते. ऑक्टोबर १९८२ मध्ये १५ परदेशी तज्ञांच्या शिष्टमंडळाने सांगलीच्या कारखान्यात भेट दिली. शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगार बंधूंनी दादांना अँबँसिडर मोटार भेट देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. १९८२-८३ ला नॅशनल फेडरेशन आँप को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी या संस्थेच्या अध्यक्षपदी वसंतदादांची निवड झाली होती.
मंत्रिमंडळाचे नेते होऊन वसंतदादांनी महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी १९८३ रोजी राज्यपाल लतीफ यांच्या हस्ते शपथ घेतली. त्याच वर्षी दुष्काळ असल्याने त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील समस्या हाताळण्यासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती जाहीर केली. त्या दरम्यान झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा वानखेडे स्टेडियम मुंबई येथे ४ जुलै रोजी भव्य सत्कार करून खेळाडूंना मुख्यमंत्री फंडातून देणगी दिली.
१९८३ साली दादांनी राज्यात ५१ नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये, ८४ तंत्रनिकेतन व १०० तंत्र शाळांना विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिली (शिक्षण मंत्री सुधाकरराव नाईक). मुलींना पाचवी ते दहावीपर्यंत मोफत शिक्षणाची सोय, त्यांच्या सूचनेनुसार संत नामदेवांच्या संतवाड्मय अभ्यासन केंद्र, पुणे विद्यापीठास देऊन सुरू केले. त्यांच्याच कालावधीमध्ये गोवधबंदी कायदा होऊन विनोबा भावे यांची इच्छा पूर्ण झाली. २० कलमी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुशिक्षित बेकारांना विनातारण स्वयंउद्योग व्यवसाय करण्यास २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य योजना, दुध महापुर योजना अशी कित्येक विधायक कामे पूर्ण केली. त्यांच्या शेती व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वसंतदादांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डॉक्टरेट ऑफ सायन्स हि सन्माननीय पदवी ६ मार्च १९८४ ला देऊन गौरविण्यात आले.
सांगलीच्या पूर्वेकडील कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी कृष्णा नदीतील पाणी ताकारी जवळ उचलून ते दुष्काळी भागास पुरवण्याच्या ८० कोटी खर्चाची तरतुदीस मंजुरी दिली, त्यामुळे हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प झाला. विनाअनुदानित तत्त्वावर प्रवरानगर, अमरावती व कराड येथे वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली.
मोटार अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना भरपाई योजना जाहीर. पाणी आडवा पाणी जिरवा ह्या योजनेची सुरवात. सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच वैयक्तिक जीवनामध्ये दादांचा स्वभाव हा स्थितप्रज्ञ असा होता जे सुखदुःख मान अपमान या दोन्हींचा आनंदाने स्वीकार करत. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे दादा अस्वस्थ झाले परंतु काँग्रेस कार्यकर्ता म्हणून विकास कामे करत राहिले. राजस्थानचे आठवे राज्यपाल म्हणून दादांनी पदभार स्वीकारला व तेथेही राज्यपाल भवन सर्वसामान्यांना खुले करून आपल्या कार्याची प्रचिती दिली. अशा कित्येक कामे दादांच्या कारकिर्दीत झाली. १ मार्च १९८९ रोजी मुंबई येथे दादांचे आकस्मिक रित्या निधन झाले अशा प्रकारे महाराष्ट्राचा महापुरुष आपल्यातून कायमचा निघून गेला परंतु त्यांच्या विकास कार्याची दखल व त्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्राची प्रगतीपथावरती वाटचाल सुरू राहिली अशा या दादांना माझे त्रिवार वंदन.
(संदर्भ: महाराष्ट्राचा महापुरुष वसंतदादा-भालचंद्र धर्माधिकारी)
- डॉ. गणेश रवींद्र पवार (ऊस पिक अभ्यासक)
