Join us

युरिया खताच्या साठ्यात तफावत; राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने केले रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:06 IST

Urea Khat Satha दुकानात खतांचा साठा असतानाही खते नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाने बडगा उभारला आहे.

दुकानात खतांचा साठा असतानाही खते नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाने बडगा उभारला आहे.

त्यानुसार राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आले आहे असून, आठ विक्री केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत.

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांकडून केलेल्या तपासणीत सुमारे ५ हजार टन युरिया खताच्या साठ्यात तफावत आढळली असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, तपासणी करताना गुणनियंत्रण निरीक्षकांकडून कामात हयगय झाल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिला आहे.

खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. सध्या पिकांसाठी खतांचा पुरवठा आवश्यक असून, खतविक्रीत होणारी अडवणूक लक्षात घेता शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.

त्यापूर्वी कृषी विभागाने किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस यंत्रांच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे.

तसेच खत विक्रीच्या नोंदी तत्काळ आणि अचूक पद्धतीने या यंत्रांमध्ये समाविष्ट करण्यासाठी ई-पॉसमधील साठा व प्रत्यक्ष साठा समान असणे गरजेचे आहे. यासाठी विक्रीची नोंद आयएफएमएस या प्रणालीमध्ये तत्क्षणी घेणेसुद्धा बंधनकारक केले आहे.

शेतकऱ्यांची अडवकणूक करणाऱ्या दुकानदारांवर ही कारवाई यापुढेदेखील सुरू राहणार आहे. अडवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. - सूरज पांढरे, आयुक्त, कृषी

अधिक वाचा: आता प्रत्येक शेताला मिळणार १२ फुटांचा शेतरस्ता; पाणंद रस्त्यांसाठी येणार 'ही' योजना

टॅग्स :खतेखरीपशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारआयुक्तमहाराष्ट्र