Join us

Us Galap 2024 : देणी थकविणाऱ्या या कारखान्यांचे गाळप परवाने प्रादेशिक कार्यालयातच अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 10:24 IST

ऊस तोडणी वाहतूक तसेच शासकीय देणी थकल्याने सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचे गाळप परवाने सोलापूर प्रादेशिक कार्यालयातच अडकले आहेत

अरुण बारसकरसोलापूर : ऊस तोडणी वाहतूक तसेच शासकीय देणी थकल्याने जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचे गाळप परवाने सोलापूर प्रादेशिक कार्यालयातच अडकले असून, चार साखर कारखान्यांचे परवाने साखर आयुक्त कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील २५ व धाराशिवच्या १२ अशा ३७ कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील श्री. संत दामाजी मंगळवेढा, जय हिंद शुगर आचेगाव, गोकुळ शुगर धोत्रा, भीमा सहकारी टाकळी सिकंदर व मातोश्री लक्ष्मी शुगर या साखर कारखान्यांनी गाळप परवाने मागितले आहेत.

मात्र, या साखर कारखान्यांकडे शासकीय तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे देणे थकले आहे. साखर हंगाम सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटला तरी या साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले नाहीत.

या साखर कारखान्यांनी देणे भरल्याशिवाय सोलापूर प्रादेशिक साखर कार्यालय गाळप परवान्यांचा प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाला पाठविणार नसल्याचे सांगण्यात आले.

श्री. विठ्ठल सहकारी पंढरपूर, श्री. संत कुर्मदास कुईवाडी, बबनराव शिंदे तुर्कपिंपरी व सहकार शिरोमणी वसंतराव काळे भाळवणी या साखर कारखान्यांनी थकबाकी भरल्याने सोलापूर प्रादेशिक साखर कार्यालयाने गाळप परवान्यांचे अर्ज साखर आयुक्त कार्यालयाला पाठविले आहेत.

या चार साखर कारखान्यांना पुढील आठवड्यात गाळप परवाने मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर प्रादेशिक साखर कार्यालय अंकीत धाराशिव जिल्ह्यातील श्री. विठ्ठलसाई तसेच खांडसरीचे डी. डी. एन व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मेहेकर अॅग्रोचे परवाने साखर आयुक्त कार्यालयात पेंडिंग आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील २५, तर धाराशिवच्या १२ अशा ३७ साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी चांदापुरी हा साखर कारखाना ओंकार ग्रुपने या अगोदरच हस्तांतर करून घेतला आहे.

आता नव्याने व्ही.पी. शुगर व विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव हे साखर कारखाने ओंकार ग्रुपने हस्तांतरण करून घेतले आहेत. राज्यातील २०७ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी सहकारी ९१ व खासगी ९५ अशा १८६ साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत.

अधिक वाचा: लाटवडेच्या शंकर पाटलांनी ऊस शेतीत केला ५५ कांड्याच्या उसाचा नवा रेकॉर्ड.. वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊससोलापूरसरकारराज्य सरकार