रोहित तवंदकरदानोळी: दानोळी (ता. शिरोळ) येथील विनायक दळवी आणि सुरेश आयरे या दोन मित्रांनी पश्चिम मळा भागात असलेल्या तीस गुंठे शेतात मिरचीचेपीक घेतले आहे.
३० गुंठ्यांत पंधरा टन मिरची उत्पादन निघेल असा अंदाज विनायक दळवी यांनी व्यक्त केला आहे. सध्या त्यांना एका तोडाला ८०० किलोहून अधिक मिरचीचा तोडा होत असून, प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळत आहे.
दानोळी येथील तरुणांचा नोकरी, व्यवसायाला बगल देत उत्कृष्ट शेती करण्याकडे ओढा वाढला आहे. या दोघांनी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन आलेल्या अनुभवावर मिरची पीक केले आहे.
यावेळी तीस गुंठे शेतीसाठी चार हजार रोपांची लागण केली आहे. मल्चिंग पेपरवर लावलेल्या रोपांना ६२ दिवसांनंतर मिरची पिकाचे उत्पन्न चालू झाले आहे. सध्या या पिकापासून एका तोडाला ८०० किलोचे उत्पन्न मिळत आहे.
मिरचीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य पाण्याचे नियोजन, योग्य खत, कीड नियत्रंण, तसेच आधुनिक यंत्राचा वापर केला आहे. ही मिरची ते वडगाव, तसेच सांगली, कोल्हापूर येथील बाजारात पाठवत आहेत.
मिरची उत्पादनाचे फायदेमिरचीचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करते. यामुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारते. मिरचीच्या उत्पादनामुळे शेतीमध्ये रोजगाराच्या संधी वाढतात.
सध्या मिरचीला बाजारात चांगला दर मिळत आहे. मिरची उत्पादनासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. दरात चढ-उतार होत आहे. मिरचीला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. पिकाचे चांगले संगोपन करून उत्पादन घेत आहे. - विनायक दळवी, शेतकरी दानोळी
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या या पाच साखर कारखान्यांवर 'आरआरसी' ची कारवाई