शिवाजी थोरात
हिंगोली : सध्या सर्वत्र वाढते उन्ह लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हळद वाळविणे सुरू केले असून, हळद वाळविण्यात व्यस्त दिसत आहेत. पहाटेच्यावेळी हळद वाळविण्यासाठी शेतकरी शेत शिवारात जाऊ लागले आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हळद काढणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. हिंगोली तालुक्यातील सवड, घोटा, केसापूर, लोहगाव, दाटेगाव, राहोली, वरुड गवळी, रामा देऊळगाव, इडोळी, इंचा आदी गावांत हळद वाळविणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.
उन्हाचा पारा अधिक वाढू लागल्यामुळे पहाटेच्यावेळी दोन कामे मागे ठेवून शेतकरी हळद वाळविण्यासाठी शेत शिवारात जाऊ लागले आहेत. मागच्या काही दिवसांपासून मजूर हळद काढणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे हळद वाळविण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत.
त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना घरातील लहान-मोठ्या सदस्यांना सोबत घेऊन शेतात हळद वाळविण्यासाठी न्यावे लागत आहे.
शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा
• गतवर्षी हळदीला १३ ते १७ हजार रुपये दर होता. त्या मानाने यावर्षी मिळत असलेला दर ९ ते ११ हजार रुपये कमी पडत आहे. कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा हळदीसाठी केलेला खर्चही निघत नाही.
• तेव्हा शासनाने शेतकऱ्यांचा झालेला खर्च पाहून हळदीला किमान २० हजार रुपये तरी भाव द्यावा, अशी मागणी सवड व परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
हेही वाचा : सालगड्यासाठी गावोगावी सुरू आहे शोधा शोध; मजुरांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे शेतकरी हैराण