Join us

भातशेतीतील पारंपारिक मळणी प्रक्रिया आता यंत्राने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2023 16:19 IST

भात तण मळणीसाठी लागणारी जनावरे, वेळ व मजुरीच्या खर्चामुळे या भातशेती प्रक्रियेतील तण मळणी या मुख्य प्रक्रियेला शेतकऱ्यांनी छेद देत सरळ तणाचे मोधळ बांधून व्यापाऱ्याला विक्री करण्यास पसंती दिली असल्याचे दिसत आहे.

सध्या शेती हा व्यवसाय करत असताना जनावरांचा भासत असलेला तुटवडा, वेळ व येणारा मजुरीचा खर्च टाळण्यासाठी भातशेती व्यवसायातील तण मळणीला शेतकऱ्यांनी छेद दिला • आहे. यामुळे मळणी ही मुख्य प्रक्रिया आता हद्दपार झाली असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या युगात भातशेती करणे फारच कठीण होऊन बसले आहे. महागडी खते, बी-बियाणे, मजुरांचा तुटवडा आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे बेमोसमी पावसाने पिकांची होणारी नासाडी आदी समस्यांमुळे भातशेती हा व्यवसाय अपार कष्ट करूनदेखील न परवडणारा व्यवसाय झाला आहे.

भातशेती करत असताना रावणी करणे, पेरणी करणे, लावणी (आवणी) करणे, कापणी (लाणी) करणे, झोडणी करणे व अखेर तण मळणी करणे आदी क्रमशील प्रक्रिया शेतकऱ्यांना कराव्या लागत असतात, मात्र तण मळणीसाठी लागणारी जनावरे, वेळ व मजुरीच्या खर्चामुळे या भातशेती प्रक्रियेतील तण मळणी या मुख्य प्रक्रियेला शेतकऱ्यांनी छेद देत सरळ तणाचे मोधळ बांधून व्यापाऱ्याला विक्री करण्यास पसंती दिली असल्याचे दिसत आहे.

वेळ व खर्चाची बचत- प्रत्येक शेतकरी झोडणीसाठी आपल्या जागेत योग्य ठिकाणी शेतखळे तयार करून झोडणी व तणाची साठवण करीत असतो.- तयार केलेल्या खळ्यात एक लाकडाचा खांब पुरुन त्याला किमान ४ ते ५ जनावरे दावणीला बांधून गोल फिरवून तण पायाखाली तुडवले जायचे, जेणेकरून झोडणीत तणाला शिल्लक असलेले भात या मळणीत शेतकऱ्यांना मिळत असे, मात्र वेळ व खर्चाची बचत तसेच जनावरांचा तुटवडा भासत असल्याने या प्रक्रियेला छेद दिला जात आहे.

बेमोसमी पावसाची असलेली भीती, जनावरांचा भासत असलेला तुटवडा, वेळ व खर्चाच्या तुलनेत तण मळणीतून भात मिळत नसल्याने तण मळणी ही पूर्वीपासूनची मुख्य प्रक्रिया करणे शेतकरी टाळीत आहेत. - दिनेश वारघडे, शेतकरी मोहोट्याचा पाडा

टॅग्स :भातकाढणीशेतकरीकोकणपीकशेती