Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तुरीच्या उत्पादनात होणार वाढ; राज्यात १३.३ लाख टन उत्पादन अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:15 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सागर कुटे

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातही तुरीच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. राज्यातील तूर उत्पादन सुमारे १३.३ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता कृषी विभागाच्या अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे.

देशातील एकूण तूर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा असून, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह महाराष्ट्राचा मिळून ६० टक्क्यांहून अधिक सहभाग आहे.

त्यामुळे या राज्यांतील उत्पादनातील चढ-उताराचा थेट परिणाम राष्ट्रीय बाजार व्यवस्थेवर होत असतो. तुरीच्या बाजारपेठेवर मागील हंगामातील शिल्लक साठा, आयातीचे प्रमाण तसेच चालू वर्षातील एकूण उत्पादनाचा एकत्रित प्रभाव दिसून येत आहे.

केंद्र सरकारने तूर निर्यातीस मोकळीक दिली असून, आयात कोटा मर्यादित ठेवण्यात आला आहे. परिणामी, देशांतर्गत उपलब्धतेवर नियंत्रण राहण्याची शक्यता असली, तरी उत्पादनवाढीमुळे बाजारभावावर दबाव येण्याची भीती व्यक्त होत आहे.

तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत जास्त

• डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा मुख्य विक्री कालावधी मानला जातो. चालू वर्षी नोव्हेंबर महिन्यातच बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली दिसून येत आहे.

• विदर्भातील अनेक प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नवीन तुरीची आवक सुरू असून, पुढील काही आठवड्यांत ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तुरीच्या बाजारावर परिणाम घटक

• तुरीच्या बाजारभावावर मागील वर्षातील शिल्लक साठा, चालू हंगामातील एकूण उत्पादन, केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण तसेच देशांतर्गत मागणी यांचा एकत्रित परिणाम होत आहे.

• विशेषतः उत्पादनवाढीच्या पार्श्वभूमीवर आवकेत वाढ झाल्यास भावांवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांसाठी आगामी काळात महत्त्वाचे ठरणारे मुद्दे

• उत्पादन वाढलेल्या स्थितीत शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय बाजारस्थिती पाहून घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

• बाजार समित्यांतील दरांवर लक्ष ठेवणे, सरकारी खरेदी केंद्रे सुरू झाल्यास नोंदणी करून हमीभावाचा लाभ घेणे आणि एकाच वेळी संपूर्ण माल विक्रीऐवजी टप्प्याटप्याने विक्रीचा विचार करणे, हे मुद्दे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहेत.

हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारकच, पण गूळ किती चांगला? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीतूरमहाराष्ट्रबाजार