Join us

वर्षभरात ८० लाख कंटेनरची वाहतूक करणारे राज्यातील हे बंदर ठरले देशातील सर्वांत मोठे बंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:18 IST

Jawaharlal Nehru Port Authority JNPA देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून जेएनपीएची ख्याती आहे. ३५ वर्षे अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी पाच बंदरे कार्यरत आहेत.

मधुकर ठाकूरउरण : देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून JNPT जेएनपीएची ख्याती आहे. ३५ वर्षे अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी पाच बंदरे कार्यरत आहेत.

'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या बीओटी तत्त्वावर खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या बंदरातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आयात-निर्यात व्यापारामुळे जेएनपीए बंदर देशाच्या विकासातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक हातभार लावत आहे.

दोन वर्षांपूर्वी जेएनपीटी बंदराचे रूपांतर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात झाले आहे. प्राधिकरणामुळे जेएनपीए आता देशातील पहिले लॅण्डलोड बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

जेएनपीएतून वर्षभरात ७५ ते ८० लाख कंटेनर मालाची वाहतूक होत आहे. देशातील सर्वात मोठ्या लांबीचे व ५० लाख कंटेनर क्षमतेचे चौथे बंदर उभारण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे तर दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या २०२५ मध्ये पूर्णत्वास जाणार आहे. जगभरात जलमार्गाने होणाऱ्या आयात-निर्यात व्यापारात मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे. वाढत्या जलवाहतुकीमुळे जेएनपीए बंदराची कंटेनर वाहतुकीची क्षमता संपुष्टात आली आहे.

यामुळे जागतिक स्तरावरील वाढल्या जलमार्गाने होणाऱ्या आयात-निर्यात व्यापाराला चालना देण्यासाठी व जेएनपीए बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

'वाढवण'ला मच्छीमारांचा विरोध• नैसर्गिक खोली लाभलेल्या आणि वर्षाकाठी दोन कोटींहून अधिक कंटेनर मालाची वाहतूक क्षमतेचे हे वाढवण बंदर जेएनपीए आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या भागीदारीतून उभारण्यात येत आहे.• ७६ हजार २०० कोटी खर्चाच्या प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमारांचा जोरदार विरोध आहे. मात्र, विरोधाची तमा न बाळगता केंद्र व राज्य सरकारच्या मदतीच्या जोरावर आवश्यक परवानग्या मिळवून वाढवण बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

नववर्षात प्रवाशांसाठी ई-स्पीडप्रदूषण नियंत्रण व रोखण्यासाठी टर्मिनलमध्ये डिझेलवर चालणाऱ्या ४०० हून अधिक गाड्या, ट्रक, टंगबोटी या इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालविण्यास सुरुवात केली आहे. मालवाहू जहाजांचा इंधन खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी २०० कोटींची पायलट योजनाही राबविण्यात येणार आहे. देशातील पहिलाच हा प्रकल्प उरला आहे. जेएनपीएने प्रवाशांसाठी ई-स्पीड सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, नववर्षात ही सेवा सुरू होणार आहे.

१० लाखांहून अधिक रोजगार• वाढवण बंदर उभारण्यात जेएनपीएची ७४ टक्के तर महाराष्ट्र मेरीटाईम बोडांची २६ टक्के भागीदारी आहे. या भागीदारीतून जागतिक स्तरावरील दहाव्या क्रमांकाचे बंदर उभारण्यात येत आहे. वाढवण बंदरामुळे १० लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालनाजेएनपीएत जहाजाच्या रांगा लागत होत्या, त्यामुळे ३११ कोटी रुपये खर्चुन कार्गो हाताळणीसाठी जुन्या जेट्टीचा विस्तार केला. यामुळे प्रतिवर्ष ६.५ दशलक्ष मेट्रिक टन तरल पदार्थ कार्गो हाताळणीच्या क्षमतेत दुपटीने वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्तजेएनपीएने उरणमध्ये २७ एकर जमिनीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषिमाल, वस्तु, आधारित प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नाशवंत माल, वस्तू टिकून राहण्यासाठी प्री-कुलिंग सुविधा, ड्राय वेअर हाऊसची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. २८५ कोटीचा हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

अधिक वाचा: Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?

टॅग्स :जेएनपीटीमुंबईशेतीशेतकरीमहाराष्ट्रराज्य सरकारसरकार