महाकाय आणि काळाभोर देहाचा, जबरदस्त शिंगांसाठी प्रसिद्ध असलेला टनभर वजनाचा गवा हा जंगली सस्तन प्राणी पश्चिम घाटातल्या जंगलाचे वैभव आहे. एकेकाळी जेथे गवताची कुरणे होती त्या जागी शेतकऱ्यांनी शेती केल्याने मानव आणि गवे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीला वनविभाग फारसा धावून जात नसल्याने शेतकऱ्यांनी या प्राण्याची धास्ती घेतली आहे. वनविभागाने त्यावर सौरकुंपणाचा पर्याय काढला असला तरी विजेच्या धक्क्याने गव्यांना रोखण्याच्या केविलवाणा प्रयत्न वनविभाग करत आहे. आजही कोल्हापूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांत गव्यांचा आणि तेथील शेतकरी यांच्यातल्या संघर्षाने टोक गाठलेले असून त्याचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत.
पूर्वीच्या काळी बांबूच्या जंगली प्रजातीच्या कोंबाचा आस्वाद घेण्यासाठी गवे येत. आता बांबूचे जंगलातील प्रमाण कमी झाल्याने आणि जंगलाची नासधूस करून त्या जागी उसासारख्या बागायती पिकांकडे लोकांचा कल वाढल्यामुळे गव्यांसारख्या महाकाय देहाच्या जंगली प्राण्याला अन्न मिळणे कठीण झाले आहे.
त्यामुळे गवे शेतकऱ्यांनी कष्टाने उभारलेल्या पिकांवर ताव मारण्यात धन्यता मानत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही हातकणंगले आणि शिरोळ हे दोन तालुके वगळले तर सर्व तालुक्यात हा प्राणी सुखेनैव संचार करतो आहे.
दाजीपूरच्या जंगलाची शान
• गवा हा प्राणी एकेकाळी करवीर संस्थानात येणाऱ्या दाजीपूरच्या जंगलाची शान होता. करवीर संस्थानातील राजे, सरदार यांच्यासाठी शिकार क्षेत्र म्हणून नावारूपास आलेले दाजीपूरचे जंगल, महाराष्ट्रात विलीन झाल्यावरसुध्दा काही काळ शिकार क्षेत्र म्हणून राहिले.
• परंतु नतरच्या कालखंडात महाराष्ट्र सरकारने १९५८ मध्ये दाजीपूरला संरक्षित अभयारण्य म्हणून अधिसूचित केले आणि त्यानंतर इथल्या जंगली श्वापदांच्या होणाऱ्या शिकारीवरती बंदी आली.
• १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांच्या जलाशयांच्या अस्तित्वाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या परिसरातल्या जंगल क्षेत्राचा या अभयारण्यात समावेश केला. दाजीपूरचे जंगल गव्यांचा सुरक्षित नैसर्गिक अधिवास आहे.
महिष कुळातील प्राणी
• प्राणिशास्त्रानुसार भारतीय जातीच्या गव्याला बॉस गॉरस असे नाव आहे. तपकिरी रंगाचे डोळे आणि पायमोजे घातल्यासारखा गुडघ्यापर्यंत भाग यामुळे गवा महिष कुळातल्या अन्य प्राण्याच्या तुलनेत वेगळा दिसतो.
• हंगामी गवतावरती प्रामुख्याने जगणारा गवा, रानातल्या वृक्षवेलींची कोवळी आणि लुसलुशीत पाने आवडीने खातात. जंगलात सह्याद्रीत कारवीची जी झुडपे असतात त्या कारवीची पाने मोठ्या आवडीने ते खातात.
• सकाळी व संध्याकाळी गवे चरण्यासाठी बाहेर पडतात आणि दुपारी उन्ह असताना एकांत सावलीत रवंथ करतात. क्षारयुक्त जमीन जेथे असेल तेथे सोडियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरयुक्त खनिजाबरोबर क्षाराची प्राप्ती करुन घेतात.
अस्तित्वासाठी संघर्ष
• गव्यांच्या कळपाचे नेतृत्व मादी करत असते, अनेकदा प्रौढ नर एकटाच माळरानावरती चरताना पहायला मिळतो. रानातल्या वृक्षवेलींचा कोवळा पालापाचोळा आणि हंगामी रानफळांचा मनसोक्तपणे आस्वाद घेणारे गवे आज शेतकऱ्यांच्या पिकांवरती घाला घालू लागलेले आहेत.
• भातपिकांची चटक त्यांना इतकी लागते की ते पुन्हा पुन्हा शेतात येतात आणि धान्य फस्त करतात, त्यामुळे त्यांचा मानवी समाजाशी संघर्ष वाढलेला आहे. अनेक ठिकाणी गव्यांची शिकारही करण्यात आली आहे. या प्राण्याला जंगलात बऱ्याचदा पट्टेरी वाघांबरोबर अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. सह्याद्रीची शान असलेल्या या गव्याला अस्तित्वासाठी जीवघेणा संघर्ष द्यावा लागत आहे.
संदीप आडनाईकउपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर
हेही वाचा : शेतशिवारात बागायतदारांचा शत्रू बनलेल्या माकडांना आवरणार कोण ?