Join us

घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ; आता किती मिळणार अनुदान? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:31 IST

Gharkul Anudan Yojana बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य हिस्यातून ही अतिरिक्त वाढ केली आहे. यातील १५ हजार रुपये हे छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी देण्यात येणार आहेत.

टप्पा क्रमांक दोनमधील पात्र लाभार्थीना ही वाढ मिळणार आहे. १ लाख २० हजार ही अनुदानाची मूळ रक्कम असून, त्यामध्ये ५० हजारांची वाढ झाली आहे.

इतर बाबींमधून मजुरी व शौचालय यांची मिळणारी रक्कम व अनुदानातील वाढ यामुळे लाभार्थीना दोन लाखांपर्यंत घरकुल बांधण्यासाठी एकूण अर्थसहाय्य मिळणार आहे.

सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे. बेघर व कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थीना स्वतःचे हक्काचे घर देण्याचा शासन प्रयत्न करते. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना त्यासाठी प्रभावीपणे काम करीत आहे.

या योजनेचा टप्पा क्रमांक दोन सुरू झाला असून, तो पाच वर्षांसाठी राबविला जाणार आहे. यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लाभार्थ्यांचा नव्याने सर्व्हे होणार आहे. त्यामुळे योजनेपासून लांब राहिले आहेत त्यांना लाभ मिळणार आहे.

योजनेतून घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपये मूळचे अनुदान मिळत होते. इतर बाबींमधून २६ हजार रुपये मजुरीसाठी मिळत होते. शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये असे १ लाख ५८ हजार रुपये मिळत होते.

सौर ऊर्जेने उजळणार घर- ५० हजारांच्या वाढीव अनुदानातून ३५ हजार रुपये बांधकामासाठी तर १५ हजार रुपये हे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावर १ केडब्लू मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी देण्यात येणार आहेत. - ही यंत्रणा उभी करणार नाहीत त्यांना १५ हजार रुपये मिळणार नाहीत. यत्रंणा उभारल्यास योजनेतील घरकुले सौर ऊर्जेने उजळून निघणार आहेत.

ग्रामीण भागातील गरजू, गरीब लोकांना घरकुल बांधून देणारी ही योजना अत्यंत उपयोगी आहे. या योजनेच्या अनुदानात वाढ झाल्याने दर्जेदार घरकुल बांधण्यास मदत होईल.

अधिक वाचा: Rain Water Harvesting : शेतकऱ्यांनो रेन वॉटर हार्वेस्टिंग करा; होतील हे पाच फायदे

टॅग्स :सरकारी योजनासरकारग्रामीण विकासपंतप्रधानसुंदर गृहनियोजनकेंद्र सरकारराज्य सरकारग्राम पंचायत