जयेश निरफळ
सध्या ज्वारी आणि गव्हाची सुगी सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी शेतामध्ये ज्वारीची काढणी आणि गव्हाची कापणी करताना लोक पाहायला मिळत आहेत. अतिशय शांततेत त्यांचं हे काम सुरू आहे.
मात्र पूर्वीप्रमाणे भलरी या गीताचे स्वर कानी पडत नाहीत. तसेच राखणीसाठी फटाक्यांचा अथवा एअरगनचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुगीतून भलरी आणि राखणीतून गोपणगुंडा हद्दपार झाल्याचे चित्र आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. पीक काढणीच्या हंगामाला सुगी, असे म्हणतात. सुगीमध्ये लोकांना भरपूर श्रम करावे लागतात.
या श्रमातून आनंद निर्माण करता यावा म्हणून पूर्वीचे लोक भलरी हे गीत गात होते. सकाळी, पहाटे किंवा दुपारनंतर शेताशेतातून भलरी गीताचे स्वर कानी पडत होते आणि लांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना शेतकरी या ठिकाणी सुगीचे काम करीत आहेत, याचा अंदाज येत असे.
काळ बदलला आणि सर्व काही आधुनिक होऊ लागले. आता सकाळी लवकर ज्वारीची काढणी सुरू होत आहे. मात्र, राजकारण आणि इतर गप्पांचा त्यामध्ये भरणा जास्त आहे.
मचाण विस्मृतीत; अन्य वस्तूंचा वापर
• गोफण चालविण्यासाठी शेतामध्ये चार खांबांवर एक तात्पुरते छत तयार केले जाई. याला मचाण असे बोलले जात होते.
• यावर उभे राहून गोपणीतून दगड शेतामध्ये भिरकवले जात असत. मचाणावरून दगड फेकल्यावर तो दूरवर जात असल्याने पूर्वी शेताशेतात मचाण बांधलेले दिसे.
• आता मात्र फटाके आणि एअरगन यांचा मोठा आवाज असल्याने मचाण कोणीही बांधत नाही. मचाण पूर्णपणे विस्मृतीत गेले आहे.
हेही वाचा : खिशाला पेन तर हातात घमेले; गावखेड्यातील शिक्षित युवक मजुरी करून करताहेत उदरनिर्वाह