Join us

अल्प, अत्यल्प शेतकऱ्यांचा वाढला टक्का तर शेती क्षेत्र घटले; 'हेक्टर'हून 'एकर'मध्ये आला शेतकरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 19:46 IST

वाढलेला जन्मदर आणि घटलेला मृत्युदर यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जमिनीच्या उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी मोठ्या क्षेत्राचे मालक असलेले शेतकरी आता अल्पभूधारक बनले आहेत.

सागर कुटे 

वाढलेला जन्मदर आणि घटलेला मृत्युदर यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जमिनीच्या उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी मोठ्या क्षेत्राचे मालक असलेले शेतकरी आता अल्पभूधारक बनले आहेत.

काही शेतकऱ्यांनी शेती विकून शहरांकडे स्थलांतर केले असून, आज ते अनेक कंपन्यांत अकुशल कामगार म्हणून काम करत आहेत. एकेकाळचे जमीनमालक आता नोकरीच्या शोधात शहरांकडे वळल्याचे वास्तव आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेती क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे आता एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन उरली आहे. २०२१-२२ च्या कृषी गणनेतील आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील सरासरी धारण क्षेत्र केवळ १.३४ हेक्टर इतके राहिले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी पाहता, बहुतेक तालुक्यांतील सरासरी धारण क्षेत्र १.१३ ते १.५९ हेक्टरदरम्यान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळी शेती क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असल्याने शेती करणेही जिकरीचे ठरत आहे.

कोणत्या तालुक्यांत किती हेक्टर सरासरी धारण क्षेत्र?  

जळगाव जामोद १.२२ 
संग्रामपूर १.२७ 
चिखली१.३१ 
सिंदखेड राजा १.२१ 
देउळगाव राजा १.१३ 
मेहकर १.४१ 
लोणार १.२९ 
खामगाव १.५९ 
शेगाव १.४९ 
मलकापुर १.४३ 
मोताळा १.४९ 
नांदुरा १.२९ 
बुलढाणा १.२७ 

जिल्ह्यातील शेतकरीशेती क्षेत्रानुसार विभागणी

• १ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी : शेतकरी - २,५५,३५६. क्षेत्र - १,४२,९३० हेक्टर

• १ ते २ हेक्टर क्षेत्र असलेले शेतकरी : शेतकरी - २,१८,५८५. क्षेत्र - ३,०६,७०५ हेक्टर

• २ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी :  शेतकरी - ९८,१८७. क्षेत्र - ३,१८,१३१ हेक्टर

• बुलढाणा जिल्ह्यातील एकूण शेतकरी व क्षेत्र : शेतकरी - ५,७२,१२८. क्षेत्र - ७,६७,७६५ हेक्टर

• सरासरी धारण : क्षेत्र - १.३४ हेक्टर

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांपुढील पर्याय काय?

• समूहशेतीचा अवलंब : एकत्रित जमिनीवर यांत्रिकीकरण व सामूहिक व्यवस्थापन शक्य.

• शेतीपूरक व्यवसाय : मधमाशी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय यांचा आधार.

• डिजिटल भूधारण नोंदी व नकाशे : मालकी हक्क स्पष्ट करून व्यवहार सुलभ करणे.

• राज्यस्तरीय लघु शेतकरी योजना : विशेष प्रशिक्षण, सल्ला, कर्ज सवलतीची गरज असून, यात शासनाने शेतकऱ्यांना योग्य ती मदत केल्यास सोयीचे होणार आहे.

आगामी काळासाठी धोक्याची घंटा

आधीच भूधारणा कमी व त्यातच शेतकरी कुटुंबातील सदस्यसंख्या वाढत असल्याने जमिनीचे तुकडे पडत आहेत. गावालगतच्या जमिनी विकसित होत असल्याने अकृषक झाल्या आहेत. परिवारातील संख्या वाढत असल्याने जमिनींचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. यासह अनेक बाबी आगामी काळासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.

घरखर्चासाठी जमिनी विक्री

घरातील लग्नकार्य, शिक्षण, दवाखाना, कर्जफेड, नोकरी आदी कारणांसाठीही शेती विकण्याचे प्रमाण मोठे आहे. शेतीतील घटलेले उत्पन्नही शेतीविक्री करण्यासाठी कारण ठरतेय.

शेती क्षेत्र घटण्याची प्रमुख कारणे

• वारसाहक्कामुळे जमिनीचे विभाजन : एकच शेत आता तीन-चार भावांमध्ये विभागले जाते.

• शहरीकरण व औद्योगिकीकरणाचा मारा : रस्ते, उद्योग, वसाहती यासाठी जमीन संपादित केली जाते.

• उत्पन्नातील अनिश्चितता व कर्जबाजारीपणा : शेतीत परवडत नसल्याने विक्री व स्थलांतर वाढले.

• तांत्रिक मर्यादा व गुंतवणुकीची अडचण : लहान तुकड्यांमध्ये यंत्र वापरणे अशक्य.

राष्ट्रीय महामार्गासाठी ठिकठिकाणी भूसंपादन

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्ग, अमरावती-जळगाव महामार्ग आणि जिगाव प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामुळे भविष्यातही शेतीक्षेत्र आणखी घटण्याची शक्यता आहे.

शेतीमध्ये पारंपरिक पिकांसोबतच प्रगत कृषितंत्राचा वापर तसेच शेतीपूरक व्यवसायाची जोड आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. - प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबुलडाणाग्रामीण विकास