Join us
Daily Top 2Weekly Top 5

जमिन मोजणीची रखडलेली कामे होणार आता झटपट; भूमी अभिलेखचा संप मिटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:07 IST

jamin mojani संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले. सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील भूमी अभिलेख मोजणीदार पदाची वेतनश्रेणी एस-८ करावी.

पुणे : भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले. सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील भूमी अभिलेख मोजणीदार पदाची वेतनश्रेणी एस-८ करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी काही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते.

त्यांच्या मागण्यांबाबत बुधवारी बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. मोजणीदारांच्या प्रतिनिधींसह जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यावेळी ऑनलाइन उपस्थित होते.

बावनकुळे यांनी मोजणीदारांची वेतनश्रेणी वाढविण्याबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जमाबंदी आयुक्तांना दिले. याबाबत वित्त विभाग तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सेवेत पाच वर्षे झाल्यानंतर पदोन्नतीसाठी परीक्षा घेणे तसेच नवीन आकृतिबंध मंजूर करणे या बाबी विभागाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात अंतर्भूत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मोजणीला जाण्यासाठी प्रवासभत्ता मंजूर करणे तसेच मोजणीसाठी रोव्हर आणि लॅपटॉप घेणे या मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन रोव्हर आणि लॅपटॉपसाठी निविदा काढण्याचे आदेश त्यांनी जमाबंदी आयुक्तांना दिले.

त्याचप्रमाणे शिपाई पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यासही त्यांनी मान्यता दिली. मोजणीदारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेत आहे.

त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेऊन सर्वसामान्यांची कामे थांबणार नाहीत यासाठी त्यांनी तत्काळ काम सुरू करावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. त्यानुसार महसूलमंत्र्यांचे आभार मानून कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले.

अधिक वाचा: सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पेरणी अगोदर करायला विसरू नका ह्या १० गोष्टी

टॅग्स :महसूल विभागसरकारसंपचंद्रशेखर बावनकुळेशेतीदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री