राज्यात उन्हाचा पारा वाढला असून, तापमानाने ४१ डिग्री पार केल्याने कमालीचा उष्मा जाणवत आहे. या उष्णतेत घरात आणि रस्त्यावर फिरणे मुश्कील होते, तर शिवारात काम करायचे म्हटले तर जिव पुरता कासावीस होतो.
सकाळी दहानंतर शेतात काम करायचे म्हटले तर घामाच्या धारा वाहण्यास सुरुवात होते. वाढते तापमान पाहता उष्माघाताची भीतीही असल्याने शेतकऱ्यांनी उन्हात काम करताना काळजी घेण्याची गरज आहे.
खरीप हंगामाची तयारीही फेब्रुवारी ते मे या महिन्यातच करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची उन्हापासून सुटका होत नाही. उन्हात काम करावेच लागते.
उन्हाचा तडाका वाढल्याने दुपारी शेतात काम करताना घामाघूम होते, अंगात त्राण राहत नाही. त्यातून अशक्तपणा येतो. जनावरांचे दूध काढून त्यांच्या वैरण, पाण्याची सोय करून शेतात जायचे म्हटले तर दहा-अकरा वाजतात.
सध्या उन्हाळी पिकांची काढणी व त्यानंतर खरीप हंगामाची तयारी सुरू होणार आहे. मशागतीची कामे कष्टाची असतात, त्यात उन्हाच्या तडाक्यामुळे त्याचा खूप त्रास होतो.
दुपारी शिवारात शुकशुकाटउन्हाळ्याच्या दोन महिन्यांत सकाळी सात ते दहापर्यंत व सायंकाळी चार ते सहा या वेळेतच शिवारात काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे दुपारी बारानंतर शिवारात शुकशुकाटच पाहावयास मिळतो.
ही लक्षणे ठरतील घातकचक्कर येणे, डोकेदुखी, मळमळणे किंवा घाम येणे ही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उन्हात शेतात काम करताना काय करावे◼️ उन्हाची तीव्रता कमी असताना सकाळी लवकर काम सुरू करणे आणि दुपारी विश्रांती घेणे.◼️ उन्हात जास्त वेळ काम करणे टाळावे. शक्य असल्यास सावलीत किंवा छताखाली काम करा.◼️ सतत पाणी प्यावे. तसेच, लिंबूपाणी, ताक यांसारखे द्रवपदार्थ घेणे फायद्याचे आहे.◼️ सुती आणि सैलसर कपडे घालावे, जेणेकरून घाम सहज निघू शकेल.◼️ डोक्यावर टोपी किंवा गमछा ठेवल्यास सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम टाळता येतो.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो शेतात गाळ भराल तर होतील हे चार फायदे; जाणून घ्या सविस्तर