Join us

आगामी पावसाळा, पूर आपत्कालीन स्थितीत रेशन वाटपासाठी शासनाने घेतला हा निर्णय; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:14 IST

Ration Vatap केंद्र सरकारने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र शासित प्रदेश व राज्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अहिल्यानगर : केंद्र सरकारने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र शासित प्रदेश व राज्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासंदर्भात राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचल करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा केला जातो. अंत्योदय योजनेचे ८७ हजार कार्डधारक असून, ३ लाख ८६ हजार लाभार्थी आहेत.

तर, प्राधन्य कुटुंब योजनेत ६ लाख ३७ हजार रेशनकार्डधारक असून, २५ लाख ६३ हजार लाभार्थी आहेत. अंत्योदय योजनेत प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३५ किलो धान्य मिळते. यात २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू असतो.

तर, प्राधन्य कुटुंब योजनेत प्रत्येक व्यक्तीला दरमहा ५ किलो धान्य मिळते, या ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मिळतो. आता तीन महिन्यांचे धान्य मिळणार आहे.

पुरवठा विभागाने आगामी पावसाळा, पूर आदी प्रतिकूल हवामान परिस्थितीत धान्य वितरण व साठवणुकीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जूनचे नियमित व जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांची अन्नधान्याची आगाऊ उचल करण्यासाठी ३० मे अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे तालुकास्तरावरील शासकीय गोदामात पुरेशा प्रमाणात धान्य उतरून घेण्यासाठी जागा आवश्यक आहे. जागा उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था करावी.

वाहतूक ठेकेदारांना २० दिवसांत तीन महिन्यांची उचल पूर्ण करण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात यावीत. केंद्र व राज्य शासनाच्या सक्त सूचना असल्याने दक्षता घेण्याचे अवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

दिवसभर दुकान खुले ठेवा◼️ पुरवठा विभागाकडून तालुकास्तरावरील गोदामात धान्याचे वितरण झाल्यानंतर तत्काळ रेशन दुकानदारांना धान्य वितरण करायचे आहे.◼️ रेशन दुकानदारांना दररोज दुकान खुले ठेऊन लाभार्थ्यांना वेळेत तीन महिन्यांचे धान्य वितरण करायचे आहे.◼️ आता लाभार्थ्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे धान्य एकाच वेळी मिळणार असून तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत.

अधिक वाचा: पावसाचा प्रत्येक थेंब साठवा; यंदा वैयक्तिक शेततळे योजनेसाठी भरघोस निधी

टॅग्स :केंद्र सरकारपाऊसराज्य सरकारअन्नहवामान अंदाजसरकारसरकारी योजना