Join us

समृद्ध शेतीची गव्यांना लागली चटक; वन्यजीव का उठताहेत मानवाच्या जिवावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:51 IST

वन्यजीव-मानव संघर्ष गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव-मानव संघर्ष गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो.

त्यातील राधानगरी आणि दाजीपूर या ३५१.१६ चौ. किलोमीटरवर पसरलेल्या या दोन्ही अभयारण्यांत अनेक वन्यजीवांचा वावर आहे. गव्यांसाठी राखीव असलेल्या या अभयारण्यात वाघाशिवाय बिबट्या, अस्वल, हत्ती यांचाही रहिवास आहे. या वन्यजीवांसाठी अन्न आणि पाण्याचा तो सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याच्या कमतरतेमुळे हे वन्यजीव मानवी वस्तीत शिरू लागले आणि वन्यजीव-मानव संघर्ष आणखी तीव्र झाला.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी, पशुहानी व पीकहानीच्या भरपाईपोटी जिल्ह्याच्या वनविभागाला १७ कोटी २६ लाखांचा भुर्दंड पडला आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत ही प्रचंड भरपाई वनविभागाला द्यावी लागली आहे. गेल्याच महिन्यात आजरा तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण भागात गव्यांनी शेतपिके उद्ध्वस्त केली आहेत. चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी भागात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एकजण जखमी झाला.

गवे, हत्तींही आपला अधिवास सोडून शहर गाठत आहेत. या प्राण्यांमुळे ऊस, शाळू, मका, भात यांसारखे पीक उद्ध्वस्त झाल्याच्या घटना राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्यांत घडल्या आहेत. वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन पडीक पडली आहे. अस्मानी संकटाबरोबरच वन्यप्राण्यांच्या त्रासानेही शेतकरी हतबल झाला आहे.

घरातील कर्ता माणूस जर दगावला तर ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होते. वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा व जंगलागतच्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मदत होईल, असे धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. अर्थात या संघर्षात मानवाचाही मोठा हात आहे. खाणकाम, भरमसाट जंगलतोड, पीकपद्धतीत अमाप बदल, भूजलाचा बेसुमार उपसा, त्यामुळे झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य, पाण्याचा खालावलेला दर्जा आदींचाही वाटा आहे.

शिवाय बदलत्या निसर्गाचाही तितकाच हातभार आहे. त्यामुळे शेती, माती, हवामान आणि वातावरण यात बदल झाल्याने वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टोकाला जात आहे. लहरी पाऊसमान, बॉक्साइडसारख्या खाणकामांमुळे नष्ट झालेली गायराने, कुरणं, कोरडे पडलेले पाणवठे, कारवीसारखी वनस्पती यांमुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत.

वन्यजीव संरक्षण व संशोधन संस्थेचे अध्यक्ष आणि वन्यजीव संशोधक अमित सय्यद म्हणतात, गेल्या दहा ते वीस वर्षात मोठी आणि बेसुमार जंगलतोड झाली आहे. त्याचा परिणाम वातावरणाच्या चक्रावर झाला आहे. त्यामुळे प्राण्यांना आवश्यक क्षार आणि पोषक तत्त्वं मिळू शकलेली नाहीत. याशिवाय त्यांच्या अधिवासात मानवाने हस्तक्षेप होतो आहे.

वन्यजीव विभागाचे माजी मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये म्हणतात, कचरा, फेकून दिलेले खाद्य व इतर अनेक कारणांमुळे वन्यजीव मानवी वस्तीजवळ येत आहेत. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवा, एकट्याने आडवाटेला जाऊ नका, दवंडी द्या, सावध राहा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गव्यांशी संघर्ष

• महाकाय व काळाभोर देहाचा, जबरदस्त शिंगांसाठी प्रसिद्ध असलेला टनभर वजनाचा गवा हा जंगली सस्तन प्राणी पश्चिम घाटातल्या जंगलाचे वैभव आहे.

• एकेकाळी जेथे गवताची कुरणे होती त्या जागी शेतकऱ्यांनी शेती केल्याने मानव व गवे यांच्यातला संघर्ष टोकाला गेला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला वनविभाग फारसा धावून जात नसल्याने शेतकऱ्यांनी याची धास्ती घेतली आहे.

• वनविभागाने त्यावर सौरकुंपणाचा पर्याय काढला असला तरी विजेच्या धक्क्याने गव्यांना रोखण्याच्या केविलवाणा प्रयत्न वनविभाग करत आहे. हातकणंगले आणि शिरोळ हे दोन तालुके वगळले तर आजही दहा तालुक्यांत गव्यांचा सुखेनैव संचार असतो व तेथील शेतकरी या संघर्षात सहभाग घेत आहेत.

• पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी यांसारख्या ठिकाणी जांभ्या दगडांची पठारे आणि हंगामी गवताने समृद्ध असलेले माळ आहेत. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ निवांतपणे गव्यांच्या कळपांना चरता येते.

• बांबूचे जंगलातील प्रमाण कमी झाल्याने आणि जंगलाची नासधूस करून त्या जागी उसासारख्या बागायती पिकांकडे लोकांचा कल वाढल्यामुळे गव्यांसारख्या महाकाय देहाच्या जंगली प्राण्याला अन्न मिळणे कठीण झाले आहे.

• कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध शेतीमुळे गव्यांना त्याची चटक लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उभारलेल्या पिकांवर ताव मारत आहे. यामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते.

संदीप आडनाईक उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर.

हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी

टॅग्स :शेती क्षेत्रकोल्हापूरप्राणीवनविभागसरकारशेतीशेतकरी