Join us

Sugarcane Irrigation : सिंचनाने 'इतक्या' हजार हेक्टरवर झाली नवीन ऊस लागवड वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:02 IST

Sugarcane Irrigation : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे. वाचा सविस्तर

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. वसमत तालुक्यास सिंचनासाठी (Irrigation) मिळणाऱ्या सिद्धेश्वर, इसापूर धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे यंदा लवकर रब्बी (Rabi) हंगामातील पाणीपाळ्या जाहीर झाल्या आहेत.

पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीवर भर दिला आहे. तिन्ही कारखाना क्षेत्रांत २ हजार हेक्टरांवर नवीन ऊस लागवड क्षेत्र वाढणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

वसमत विभागात पूर्णा सहकारी साखर कारखाना (Sugarcane Factory), टोकाई सहकारी साखर कारखाना, कोपेश्वर साखर कारखाना, असे तीन साखर कारखाने आजमितीस कार्यरत आहेत. तिन्ही कारखाना कार्यक्षेत्रात २२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड असते. यावर्षी इसापूर, सिद्धेश्वर या दोन्ही धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामासाठीही पाणीपाळी मिळणार आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीवर भर दिला आहे. तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, वसमत, सोमठाणा, मंहमदपूरवाडी, पार्टी (खु), पार्टी बा, खाजनापूरवाडी, कवठा, बोराळा, महागाव, धामणगाव आदी गावांत नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात घेतले जाते.

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे बोअरवेल व विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत.

पाच फुटांच्या सरीवरती ऊस

शेतकऱ्यांकडे सध्या नवनवीन उसाच्या जातीची लागवड केली जात आहे. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचा वापर केला जात आहे. एक डोळा पद्धत, टोकण पद्धतीने लागवड केली जात आहे. ऊसतोडीसाठी ऊसतोड टोळ्या वेळेवर मिळत नाहीत.

ऊसतोड यंत्र तालुक्यात वाढले आहेत. त्यामुळे चार ते पाच फूट सरीवर ऊस लागवड केली जात आहे. सिंचनाच्या सोयी सुविधा वाढल्याने या भागात उसाची लागवड देखील वाढली आहे. ऊस लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

दोन्ही हंगामांत पाणी नियोजन योग्य करावे

रब्बी हंगामात पाणी वेळेवर मिळत आहे, परंतु पुढील दोन महिन्यांनंतर उन्हाळी पाणीपाळीचे नियोजन पाटबंधारे विभागाने योग्य प्रकारे करावे. जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना समान न्यायाने पाणी मिळेल. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही पाणीपाळी वेळेवर सोडावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात २ हजार हेक्टरांवर आतापर्यंत पूर्व हंगामी ऊस लागवड झाली आहे. यावर्षी मुबलक पाणीसाठ्यामुळे २ हजार हेक्टरांवर नवीन उसाची लागवड होण्याची शक्यता आहे. - सुनील भिसे, तालुका कृषी अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Natural Farming : 'या' जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवर होणार नैसर्गिक शेतीचा प्रयोग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रऊससाखर कारखानेहिंगोलीपाणीशेतकरीशेती