सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ चा गळीत हंगाम रविवार (दि. ३०) रोजी बंद झाला. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम चालू वर्षी साडेचार महिन्यांतच बंद झाला.
संपूर्ण उसाचे गाळप झाल्यानंतरच कारखाना प्रशासनाने हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. सोमेश्वर कारखान्याने चालू हंगामात उच्चांकी १२ लाख २४ हजार ५०० मे. टन ऊस गाळप केला आहे.
हंगाम संपल्यानंतर ऊसतोडणीकामगारांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला होता.
राज्यातील कारखाने पंधरा दिवस उशिरा सुरू झाले होते. हंगाम बंद झाल्याने गेल्या साडेचार महिन्यांपासून गजबजलेला सोमेश्वर परिसर आता ओस पडणार आहे. उसतोड कामगारांनी गुढीपाडवा हा सण आपल्या पालावरच साजरा केला.
या वर्षी ऊस हंगाम महिनाभर लवकर उरकला. त्यामुळे या वर्षीचा व्यवसाय तोट्यात गेला. घेतलेल्या उचली फिटल्या नाहीत, आता गावाकडे जाऊन तरी काय करणार. हाताला काम नाय. जनावर कशीबशी जगतायची. इथे राहून कमीत कमी हाताला काम तरी मिळते. जनावरे तरी जगतात.
सोमेश्वर कारखान्याची ऊस गळीत हंगामाची सांगता झाली आहे. या हंगामात कारखान्याने १२ लाख २४ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करत १२.७ चा साखर उतारा राखला आहे. यापूर्वीच सोमेश्वरने सभासदांना एफआरपीची ३१७३ रुपये रक्कम अदा केली असून, सोमेश्वर राज्यात उच्चांकी दराची परंपरा कायम राखणार. - पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी राज्यातील या कारखान्यांना कर्जावर व्याज अनुदान मिळणार