उमेश जाधवकामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील सर्जेराव पाटील यांनी निंबाळकर मळा परिसरातील आपले २० गुंठे शेत प्रकाश निंबाळकर यांना वाट्याने करावयास दिले होते. त्यांनी आडसाली उसाची लागण करत २० गुंठ्यामध्ये ६० टनाचे उत्पादन घेतले आहे.
निंबाळकर यांनी कृष्णा कारखान्याला ऊस पाठवला. सुरुवातीला त्यांनी वीस गुंठे क्षेत्र नांगरट करून चार ट्रॉल्या शेणखत घातले व रोटर मारून साडेचार फुटाची सरी सोडून त्यामध्ये ८६०३२ वाणाची लागण केली.
त्याचवेळी त्यांनी एक बंदी टोकन पद्धतीने लागण केली. त्यानंतर लागण उगवून आल्यानंतर त्यांनी कीटकनाशक फवारणी केली.
साडेतीन ते चार महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी ताग कापून उसाच्या सरीमध्ये टाकला व १०:२६:२६ व निंबोळी पेंड प्रत्येकी तीन पोती टाकून ऊस कुळविला.
त्यानंतर परत त्यानी कीटकनाशकाच्या व टॉनिकच्या दोन फवारण्या केल्या. या २० गुंठे क्षेत्रासाठी त्यांनी बोरचे पाणी वापरले १५ दिवसांनी एक पाण्याची पाळी दिली त्यामुळे उसाची उंची वाढण्यास मदत झाली.
ऊस कारखान्याला नेते वेळी उसाच्या ५२ कांड्या होत्या. त्यामुळे वीस गुंठे क्षेत्रांमध्ये त्यांना ६० टन असे विक्रमी उत्पादन घेता आले.
अडसाली लागण करून ऊस कारखान्याला जाईपर्यंत वीस गुंठे क्षेत्रासाठी त्यांना ४० ते ४२ हजार रुपये पर्यंत खर्च आला.
अधिक वाचा: Reshim Sheti Success Story : रेशीम व्यवसायातून हा जिगरबाज युवा शेतकरी महिन्याला घेतोय एक लाखाचा पगार