Join us

Sugarcane Factory : उसाचे दीड महिन्यात झाले सव्वातीन लाख मेट्रिक टन गाळप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 17:33 IST

Sugarcane Factory : वसमत विभागातील दोन सहकारी व एक खासगी कारखान्याने दीड महिन्यात किती मेट्रीक टन उसाचे गाळप केले ते वाचा सविस्तर

इस्माईल जहागीरदारवसमत : विभागातील दोन सहकारी व एक खासगी कारखान्याने(Factory) दीड महिन्यात ३ लाख २१ हजार ५८१ मेट्रिक टन उसाचे(Sugarcane) गाळप पूर्ण केले आहे. उसाचे फड मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने यंदा कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गूळ कारखान्यांनाही गाळपास मुबलक प्रमाणात ऊस मिळत आहे. कारखानेही गाळपात पुढे आहेत, तर उसाचे प्रमाण पाहता परजिल्ह्यातील कारखानेही उसासाठी सक्रीय झाल्याचे चित्र आहे.

वसमत विभागात पूर्णा सहकारी साखर कारखाना व टोकाई सहकारी साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत व कोपेश्वर हा खासगी कारखाना आहे.

यात पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ४३ दिवसांत १ लाख ४० हजार ६८० मेट्रिक टन, तर कोपेश्वरने ४७ दिवसांत १ लाख ४९ हजार ७१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. टोकाई सहकारी साखर कारखान्याने १७ दिवसांपूर्वी गाळपास सुरुवात केली असून, या कारखान्याने ३ जानेवारीपर्यंत ३१ हजार ८३० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

तीन कारखान्यात आतापर्यंत ३ लाख २१ हजार ५८१ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले असून, पूर्णा सहकारी साखर कारखान्याने साखरेसह वीज, इथेनॉल, अल्कोहोल निर्मिती केली आहे. तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, बोराळा, वसमत, पळसगाव आदी १२ ते १५ गूळ कारखाने गाळप करत आहेत. गूळ कारखान्यानाही गाळपास ऊस देत आहेत.

ऊस उत्पादकांना वाढीव दराचे आमिषवसमत परिसरात तीन कारखाने असताना याच भागातील ऊस नेण्याचा प्रयत्न परजिल्ह्यातील काही कारखान्यांकडून सुरू आहे. ऊस उत्पादकांना वाढीव दराचे आमिषही दाखविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, हक्काचा कारखाना केव्हाही परवडला, असे म्हणत शेतकरी विभागातील कारखान्यांना ऊस देण्यास पसंती दर्शवित आहेत.

कारखाना क्षेत्रात १८ हजार हेक्टरवर ऊस शिल्लक

* वसमत भागात यंदा उसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. तीन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सद्यः स्थितीत १८ हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक असल्याची माहिती आहे.

*स्थानिक कारखान्यांचे गाळपही समाधानकारक झाल्याने आता बाहेरील जिल्ह्यातील कारखाने या भागातील ऊस नेण्यासाठी सक्रीय झाले असल्याचे चित्र आहे.

पूर्णा कारखान्याला ऊस द्यावा

पूर्णा कारखाना क्षेत्रात १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. कारखाना या सर्व उसाचे गाळप करणार असून, शेतकरी सभासदांनी आपल्याच कारखान्याला ऊस देणे गरजेचे आहे, परजिल्ह्यातील कारखान्यांना ऊस देऊन पैशांसाठी चकरा मारण्याची वेळ येऊ शकते. - सुनील दळवी, कार्यकारी संचालक, पूर्णा सहकारी साखर कारखाना

हे ही वाचा सविस्तर: Sugarcane Rate : सातपुडा, ओंकार शुगरतर्फे उसाला प्रतिक्विंटल 2800 रुपयांचा भाव, वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रऊससाखर कारखानेहिंगोलीशेतकरी