Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sugarcane Factory : राज्यातील एवढेच साखर कारखाने सुरू! अजून पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम सुरूच झाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 20:21 IST

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत म्हणजे ५ डिसेंबरपर्यंत केवळ १४3 साखर कारखाने सुरू झालेले आहेत.

Pune :  राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना संपत आला तरीही राज्यातील गाळप हंगाम अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. महाराष्ट्र हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत जास्त साखर उत्पादन करणारे राज्य आहे. त्यातच यंदा राज्याचा गाळप हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झालाय तरीही अजून जवळपास ५० पेक्षा अधिक कारखान्यांनी आपले गाळप सुरूच केले नाही. 

दरम्यान, साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार यंदा २०४ साखर कारखान्यांनी गाळपाच्या परवान्यासाठी अर्ज केले होते. २७ नोव्हेंबर अखेर त्यातील काही साखर कारखान्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून पुन्हा पाठवण्यात आले आहेत. तर काही साखर कारखान्यांचे गाळप परवाने प्रलिंबत होते. उर्वरित साखर कारखान्यांना परवाने देण्याचे काम चालू होते. 

त्याबरोबरच ५ डिसेंबरपर्यंत राज्यातील केवळ १४३ साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे. तर उर्वरित साखर कारखाने अद्यापही सुरू झालेले नाहीत. या साखर कारखान्यांकडून आत्तापर्यंत १०५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. तर त्यातून ८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे. आत्तापर्यंतचा सरासरी उतारा हा ७.६४ एवढा होता.

राज्यातील अनेक भागांत मान्सूनचा पाऊस उशिरापर्यंत चालू असल्यामुळे कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या फडात ओल जास्त होती. त्यामुळे काही कारखान्यांनी गाळपाला उशिरा सुरूवात केली. तर अनेक भागांतील कारखाने साखर उतारा आणि कार्यक्षेत्रातील उसाचे प्रमाण पाहता उशिरा गाळपाला सुरूवात करतात असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

यंदा उसाखालील क्षेत्र हे १ लाख हेक्टरने कमी झाले असले तरी गुऱ्हाळांची संख्या आणि हार्वेस्टरची संख्या वाढल्यामुळे हंगाम लवकर आटोपण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. साधारण एप्रिल महिन्यात गाळप हंगामाचा शेवट होईल अशी शक्यता आहे. 

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेती क्षेत्रशेतकरी