Pune : राज्यात यंदा उशिराने सुरू झालेला उसाचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामातील एकूण २०० साखर कारखान्यांपैकी १४५ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर अजूनही ५५ साखर कारखाने सुरू आहेत. कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप झाल्यानंतर कारखाने टप्प्याटप्प्याने बंद होतील.
दरम्यान, यंदा १५ नोव्हेंबरला गाळप हंगाम सुरू झाला होता पण विधानसभा निवडणुकीमुळे अनेक कारखान्यांनी आपले गाळप हे उशिराने सुरू केले होते. राज्यात आत्तापर्यंत ८ कोटी २९ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून यातून ७ कोटी ८१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर आत्तापर्यंत साखरेचे उतारा हा केवळ ९.४२ टक्के एवढा होता.
मागच्या वर्षीच्या गाळप हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही कमी झाले आहे. एक लाख हेक्टर उसाचे क्षेत्र कमी असले तरी साखरेचे उत्पादन हे कमालीचे घटले होते. मागच्या गाळप हंगामात यावेळी १० कोटी ७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते तर ९ कोटी ९२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते.
मागच्या हंगामात याच वेळी २०७ पैकी केवळ ६१ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते पण यंदा मात्र २०० पैकी १४५ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले असून येणाऱ्या २ ते ३ आठवड्यामध्ये राज्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपेल आणि गाळप हंगामाची सांगता होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.