Pune : राज्यातील उसाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू झाला आहे. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये गाळप हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झाला असून कारखान्यांची संख्याही कमीच आहे. मागच्या वर्षी २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले होते पण यंदा कारखान्यांची संख्या कमालीची घटली आहे.
दरम्यान, २२ डिसेंबर पर्यंत राज्यातील ९५ सहकारी आणि ९२ खासगी साखर कारखाने मिळून एकूण १८७ साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केली आहे. तर ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २० ने कमी आहे. सर्वांत जास्त साखर कारखाने सोलापूर विभागात (४०) सुरू झाले असून त्यापाठोपाठ कोल्हापूर (३९), पुणे (३१) विभागात सुरू झाले आहेत. तर नागपूर विभागात केवळ २ साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केलेली आहे.
यंदा उसाचे क्षेत्रही १ लाख हेक्टरने कमी झाले आहे. आत्तापर्यंत म्हणजे २२ डिसेंबर पर्यंत २६९ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप या कारखान्यांकडून झालेले आहे. या गाळपातून २२५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर आत्तापर्यंतचा सरासरी उतारा हा ८.३८ टक्के एवढा आहे. हा उतारा येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदाचा गाळप हंगाम हा दरवर्षीपेक्षा कमी कालावधीमध्ये संपण्याची शक्यता साखर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उस तोडणीसाठी हार्वेस्टरची मदत आणि उसाखालील क्षेत्रात घट झाल्यामुळे यंदा एप्रिल महिन्यात गाळपाची सांगता होण्याची शक्यता आहे.