Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sugar Factory : 'विलास' युनिट - १ चा किमान अंतिम ऊस दर जाहीर; शेतकऱ्यांच्या बँकेत पहिला हप्ता जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:36 IST

Sugar Factory : विलास सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर केले आहेत. ते वाचा सविस्तर

लातूर : विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट-१, वैशालीनगर, निवळी या कारखान्यामार्फत विद्यमान गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ऊसास(Sugarcane) पहिला हप्ता(Installment) आणि किमान अंतिम ऊसदर देण्याबाबतचे धोरण मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले आहे.

निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट- १ ने चालू हंगामात गाळपास आलेल्या उसाला पहिल्या हप्त्यापोटी २ हजार ७०० रुपये प्रति मेट्रीक टनांप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. अंतिम ऊस दर किमान ३ हजार रुपये प्रति मेट्रीक टन राहणार आहे, अशी माहिती मांजरा परिवाराने दिली.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री, आ. अमित देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

यंदाच्या हंगामात ३१ डिसेंबरअखेर १ लाख ७१ हजार ८४० मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून दैनंदिन साखर उतारा १२.३६ टक्के व सरासरी साखर उतारा ११.२५ टक्के आहे. १ लाख ७६ हजार ५१० क्विंटल शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन झाले आहे.

चालू हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.

विलास कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादकांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. चालू हंगामातही विलास साखर कारखाना सर्वोत्तम ऊस दर देण्याची परंपरा कायम राखणार आहे. कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांनी कारखान्यास ऊसपुरवठा करावा. तसेच पुढील हंगामासाठी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे.

पुढील हंगामातील संपूर्ण उसाचे गाळपाचे सूक्ष्म नियोजन कारखान्यामार्फत करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली.

२० डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या उसाची रक्कम अदा

• मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केलेल्या मांजरा परिवारातील निर्णयाप्रमाणे विलास साखर कारखान्याने २० डिसेंबर अखेर गाळपास आलेल्या उसास पहिला हप्ता २ हजार ७०० रुपये प्रति मेट्रीक टनाप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

• चालू हंगामात गाळपास आलेल्या उसास किमान ३ हजार रुपये प्रती मेट्रीक टनाप्रमाणे ऊस दर अदा करण्यात येणार आहे, विलास कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादकांच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Sugarcane FRP : दिवसाला अठरा हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणाऱ्या जरंडेश्वर कारखान्याचा दर जाहीर

टॅग्स :शेती क्षेत्रऊससाखर कारखानेशेतकरीशेती