Join us

वसमत विभागातील साखर कारखान्यांचे मार्च महिन्याअखेर गाळप हंगाम बंद होणार? वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:53 IST

Sugar Factory : वसमत विभागातील १ खाजगी आणि २ सहकारी साखर कारखान्यांनी ४ महिन्यांमध्ये ८ लाख ५६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत विभागातील १ खाजगी आणि २ सहकारी साखर कारखान्यांनी ४ महिन्यांमध्ये ८ लाख ५६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

सद्यःस्थितीत कार्यक्षेत्रातील ऊस संपत आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे मार्च महिन्याअखेर गाळप हंगाम बंद होणार असल्याचे चिन्हे आहेत.

वसमत तालुक्यातील डझनभर असलेल्या गूळ कारखान्यांनी उसाअभावी आपले गाळप बंद केले आहे.

वसमत विभागातील पूर्णा सहकारी साखर कारखाना, टोकाई सहकारी साखर कारखाना आणि खाजगी कोपेश्वर साखर कारखाना या ३ साखर कारखान्यांनी ४ महिन्यांत ८ लाख ५६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तिन्ही कारखाना कार्यक्षेत्रातील गाळपास असलेला ऊस आटोक्यात आला आहे.

पूर्णा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात जवळपास १२०० हेक्टरांवरील ऊस तोडणी शिल्लक आहे, तर टोकाई सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ३० हेक्टरांवरील ऊस शिल्लक आहे. टोकाई सहकारी साखर कारखाना १० मार्च रोजी गाळप हंगाम बंद करणार आहे.

कोपेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रातही थोडाफार ऊस तोडणीसाठी शिल्लक आहे. २०२३-२४ मध्ये टोकाई साखर कारखाना जानेवारीत बंद झाला होता, तसेच गाळपही कमी झाले होते. २०२४-२५ मध्ये २ मार्चपर्यंत 'टोकाई'ने १ लाख २० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

वसमत विभागातील तिन्ही कारखान्यांचा गाळप हंगाम मार्च महिन्याअखेरपर्यंत चालणार नाही, असे शिल्लक ऊस क्षेत्रावरून पहावयास मिळत आहे. मार्च महिना गाळपासाठी अखेरचा असल्यामुळे शेतकरीवर्ग कारखान्याला ऊस नेण्यासाठी लगबग करु लागला आहे. मिळेल त्या वाहनांनी ऊस नेला जात आहे.

ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

मार्च महिन्यानंतर उसाचे गाळप बंद होणार आहे. हे पाहून शेतकरी जवळच्या कारखान्याला ऊस घालण्यासाठी धडपड करू लागला आहे. काही शेतकरी गाडीबैलाद्वारे ऊस कारखान्यावर नेत आहेत तर काही शेतकरी ट्रॅक्टर व इतर छोट्या वाहनचालकांना ऊस नेण्यासाठी विचारणा करू लागले आहेत.

शिल्लक ऊससंपेपर्यंत होणार गाळप

'पूर्णा'ने ३ लाख ६६ हजार ८२७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात १२०० हेक्टरांवरील ऊस शिल्लक आहे. शिल्लक ऊस तोडणीसाठी नियोजनाला पूर्णपणे गती देण्यात आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस संपेपर्यंत गाळप हंगाम सुरू राहणार आहे. - केशव आकुसकर, 'पूर्णा' कार्यकारी संचालक, वसमत.

हेही वाचा :  गोवर्धनरावांच्या गोठ्यातील बकरीने पाचव्यांदा दिला पाच पिल्लांना जन्म; परिसरात चर्चेचा विषय ठरतेय बकरी

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेती क्षेत्रहिंगोली