राजरत्न शिरसाट
अकोला :विदर्भातील थंडी आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे महाबळेश्वरपेक्षाही गोड स्ट्रॉबेरी उत्पादन घेता येत असल्याचे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भातील वातावरणात उत्पादन घेता येणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या पाच जातींवर डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाने संशोधन हाती घेतले आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांतील वातावरण या पिकासाठी पोषक आहे. यामुळे या भागातही या पिकांचा प्रसार करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा मानस आहे.
सध्या वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत आठ शेतकऱ्यांनी महाबळेश्वर येथून रोपे आणून १८ हेक्टरवर स्ट्रॉबेरी लागवड केली आहे.
एका एकरात जवळपास या शेतकऱ्यांना चार ते पाच लाख रुपये उत्पादन झाले आहे. दोन ते अडीच लाख लागवडीचा खर्च वजा केला तरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळाले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पुढाकार घेत स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत
यशस्वी लागवड
यावर्षीच्या हंगामात शास्त्रशुद्ध पद्धतीने बेडवर स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली असून, त्यानंतर त्याला मल्चिंगचे आवरण टाकण्यात आले आहे. यावर्षी ठिबकद्वारे सिंचनाचे नियोजन करण्यात आल्याने उत्पादन खर्च कमी लागणार आहे.
महाबळेश्वरपेक्षा विदर्भात गोडवा
* स्ट्रॉबेरीची लागवड ऑक्टोबर महिन्यात केली जाते. ऑक्टोबर ते जानेवरीपर्यंत विदर्भात हिवाळा ऋतू असतो. यामुळे थंडीही उत्तम असते. विदर्भात थंडीसह प्रखर सूर्यकिरणेही या पिकावर पडतात.
* हीच सूर्यकिरणे या पिकात गोडवा निर्माण करतात. या उलट महाबळेश्वरला थंडी खूप असते; परंतु प्रखर सूर्य किरणे मिळत नाहीत, म्हणूनच विदर्भात स्ट्रॉबेरी लागवडीवर कृषी विद्यापीठाने भर दिला आहे.
हवामान बदलामुळे सर्वत्र थंडी, तापमानात बदल झाला आहे. तसा पीक पद्धतीतही बदल होत आहे. विदर्भातील वातवरण स्ट्रॉबेरी पिकाला पोषक असल्याने गोड स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येते, यामुळेच स्ट्रॉबेरीच्या पाच जातींवर संशोधन हाती घेतले आहे. - डॉ. जीवन कथोरे, केव्हीके, सेलसुरा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ