Join us

राज्यातील 'या' दोन साखर कारखान्यांना कर्ज मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 10:34 IST

Loan for Sugar Factory राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. २६) पुणे जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अनंतनगर, निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलासाठी ४०२ कोटी ९० कोटी रुपये मार्जिन मनी कर्जाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राजगड सहकारी साखर कारखान्याने खेळत्या भांडवलासाठी सादर केलेल्या ४९९ कोटी १५ लाख रुपयाच्या मार्जिन मनी कर्ज मागणीतील ४०२ कोटी ९० लाख रुपयांच्या कर्जास मान्यता देण्यात आली.

या प्रस्तावामध्ये साखर प्रकल्प आधुनिकीकरण व विस्तारिकरण, आसवणी प्रकल्प उभारणी, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायो सी बी जी प्रकल्प उभारणीसाठी ३२७ कोटी २५ लाख रुपये, विविध बँकांच्या कर्ज परतफेडीकरीता ६७ कोटी २३ लाख रुपये, यंत्र सामुग्री दुरुस्ती आणि देखभाल खर्च भागविण्यासाठी ८ कोटी ४२ लाख रुपयांचा समावेश आहे.

मार्जिन मनी लोन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यापुर्वी राजगड साखर कारखान्याने केंद्र सरकारकडून प्रकल्प विस्तारी करणासाठी आवश्यक असणारी मंजुरी घ्यावी.

तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुर्व परवानगी घ्यावी. त्याच बरोबर २५ जून, २०२५ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करावे, या अटींवर कारखान्या प्रस्तावावर मान्यता देण्यात आली आहे.

त्याच बरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास ३९ कोटी ८८ लाख रुपयांचे मुदत कर्ज राज्य सहकारी बँकेकडून घेण्यास मान्यता देण्यात आली.

या कर्जास कारखान्याचे संचालक मंडळास वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जबाबदार असेल, कर्ज वितरणापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी अशा अटीसह शासन हमी देण्यास मान्यता देण्यात आली.

अधिक वाचा: शेतजमीन सातबारा, नकाशा व इतर महसूल सेवांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आता झटपट; वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतीराज्य सरकारसरकारकेंद्र सरकारअहिल्यानगरपुणे