Join us

"सोयाबीनला कवडीचापण भाव मिळेना, शेतातून काढायलाबी पुरत नाय"; सोयाबीन उत्पादक कोलमडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:18 IST

बाजारात आर्द्रतेच्या नावाखाली सोयाबीनला कवडीमोल दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची शेतातून काढणी करायलाही परवडत नाही.

Pune :  "आज दिवसभर सोयाबीन काढून दमलोय. मजूरांचे वांदे झालेत, मजूरंच भेटना झालेत. खरं तर काढायलाबी पुरत नाही पण पर्याय नाही. खोटं नाही सांगत, अक्षरशः सोयाबीनला फुटकी कवडीचाबी दर मिळानाय." बुलढाण्यातली रवि फलटणकर या तरूण शेतकऱ्याने एकाच दमात सांगितलेली ही व्यथा. राज्यात कुठेच सोयाबीनला हमीभावाएवढा दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. 

दरम्यान, राज्यातील सोयाबीनच्या काढण्या अंतिम टप्प्यात असून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही सोयाबीनची काढणी सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीनच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याची सर्वांत मोठी अडचण आहे. सोयाबीन काढली तरीही बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रूपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करूनही सध्या सोयाबीन ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये क्विंटलने विक्री होत आहे. सरकारचे हमीभाव खरेदी केंद्रंही अजून सुरू झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने विक्री करावी लागत आहे. सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याचे कारण पुढे करत कमी दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. 

हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पणन मंडळाकडून कारवाई करण्यात येते पण अद्याप पणन मंडळाकडून कोणत्याची प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. दरम्यान, निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी पुरता दुर्लक्षित झाला आहे.

सध्या सोयाबीनला मजूरांची मोठी अडचण आहे. बाजारात अक्षरशः कवडीमोल दर मिळतोय, त्यामुळं सोयाबीन काढायलाबी पुरत नाही, पण नाईलाज आहे. सरकारचं शेतकऱ्यांकडं लक्षच नाही.- रवी फलटणकर (तरूण शेतकरी, बुलढाणा)

टॅग्स :सोयाबीनशेतकरीमहाराष्ट्र