Join us

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदी थांबली! सरकारकडून मुदतवाढ नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 22:38 IST

ज्या शेतकऱ्यांकडे सध्या सोयाबीन राहिलेली असेल अशा शेतकऱ्यांनी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी न्यायची आहे. त्या ठिकाणीसुद्धा हमीभावानेच सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. 

Pune :  महाराष्ट्रात सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची अंतिम मुदत संपली असून यामध्ये राज्य किंवा केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची मुदवाढ दिली नसल्याचे राज्याच्या पणन विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी १३ जानेवारी २०२५ रोजी संपला होता.

पहिली मुदत संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ  ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.  त्या नंतर राज्यात सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून कुठलीही मुदतवाढ दिलेली नाही, असे पणन विभागाने स्पष्ट केले आहे.

काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणा मध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे मा. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे सध्या सोयाबीन राहिलेली असेल अशा शेतकऱ्यांनी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी न्यायची आहे. त्या ठिकाणीसुद्धा हमीभावानेच सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीबाजारमार्केट यार्ड