पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट परिसरातील गावांमध्ये एकेकाळी भुईमूग हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. शेतकरी आपल्या शेतांमध्ये भुईमूग पेरून चांगले उत्पन्न मिळवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भुईमुगाचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
बदलते हवामान, जमिनीची घटती सुपीकता आणि कीटकांचे वाढते अतिक्रमण यामुळे शेतकरी आता सोयाबीनच्या लागवडीकडे कळत आहेत. यामुळे माळशेज परिसरात सोयाबीन हे शेतक-यांचे प्रमुख पीक बनत चालले आहे.
माळशेज परिसरातील शेतकऱ्यांना भुईमूग पिकासाठी अनुकूल हवामान, सुपीक जमीन आणि वेळेवर पाऊस यासारख्या गोष्टींची गरज असते. मात्र, गेल्या काही वर्षात वारंवार बदलणारे हवामान, उशिरा येणारा किंवा अतिवृष्टीचा पाऊस, जमिनीतील पोषक द्रव्यांची कमतरता आणि उणीसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे भुईमुगाचे उत्पादन खूपच कमी झाले आहे. याशिवाय, रासायनिक खतांचा अतिवापर आणि मातीची घटती सुपीकता यामुळेही भुईमूग पिकाला मोठा फटका बसला आहे.
प्रगतिशील शेतकरी शरद अनंता फापाले सांगतात, "पूर्वी आमच्या शेतात दरवर्षी भुईमूग पेरायचो. एका एकरातून २८ ते ३० पोती शेंगा मिळायच्या पण आता जमिनीत ताकदच राहिली नाही. मेहनत करूनही ६ ते ७ पोतीच मिळतात.
खतांचा खर्च, मजुरी वाढली आहे; पण उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे सोयाबीन हाच पर्याय उरला आहे. सोयाबीन कमी खर्चात आणि कमी वेळात तयार होते. बाजारात चांगला भाव मिळाला की लगेच विकता येते."
शेतीतील बदलते चित्र
माळशेज परिसरात सोयाबीनच्या लागवडीत वाढ झाल्याने शेतीचे चित्रच बदलत आहे. पूर्वी भुईमूगाच्या शेंगांनी भरलेली शेते आता सोयाचीनच्या हिरव्यागार पिकांनी व्यापली आहेत. शेतक-यांचा हा बदलता दृष्टिकोन शेतीच्या आर्थिक गणितांशी निगडित आहे. सोयाबीनच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळत आहे, तर बाजारातील मागणीमुळे त्यांना स्थिरता मिळत आहे.
३० पोती शेंगा एका एकरातून मिळत असायच्या
एका एकरातून २८ ते ३० पोती शेंगा मिळायच्या. पण आता जमिनीत ताकदच राहिली नाही. मेहनत करूनही ६ ते ७ पोलीच मिळतात. खतांचा खर्च, मजुरी वाढली आहे.
सोयाबीनचा वाढता ओढा
• भुईमूगाच्या तुलनेत सोयाबीनचे पीक कमी अधिक आणि कमी वेळात तयार होणारे आहे. भुईमूगाच्या एका एकरासाठी बियाणे, मजुरी, खते आणि औषधांवर हजारो रुपये खर्च होतात, मात्र उत्पादन खर्च वसूल होईल इतके उत्पन्न मिळत नाही. याउलट, सोयाबीनच्या लागवडीसाठी कमी खर्च येतो आणि उत्पादनही चांगले मिळते.
• बाजारात सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी वा पिकाकडे आकर्षित होत आहेत, माळशेज परिसरातील शेतकरी सागर पचार म्हणाले, "सोयाबीनची लागवड सोपी आहे आणि बाजारात त्याला मागणीही चांगली आहे. भुईमूगाच्या तुलनेत सोयाबीनला कमी पाणी आणि देखभाल लागते. त्यामुळे आम्ही आता सोयाबीनवरच लक्ष केंद्रित केले आहे."
आव्हाने आणि उपाय
• भुईमूग पिकाच्या उत्पादनातील घट ही केवळ माळशेज परिसरापुरती मर्यादित नाही, तर यामागील कारणे संपूर्ण शेती क्षेत्रासाठी विचार करण्यासारखी आहेत.
• शेतकऱ्यांना सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची फेरपालट आणि कीटकनाशकांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शनाची गरज आहे.
• कृषी तज्ज्ञांच्या मते, मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची गरज आहे.