Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी फर्दडीच्या मागे न लागता हरभरा पेरा अन् खरीपातील उणीव रब्बीतून भरून काढा; कृषी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:57 IST

सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे.

सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. एक ते दोन वेचणीतच कपाशी झाडांची पऱ्हाटी झाली आहे.

त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे.

अतिपावसामुळे सिल्लोड तालुक्यातील ८० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशीला फटका बसून उत्पन्न सुमारे ५० टक्क्यांनी घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामातील पिकांसाठी मेहनत घ्यावी.

हरभऱ्याची पेरणी हा चांगला पर्याय ठरू शकतो असे तालुका कृषी अधिकारी जगताप यांनी सांगितले. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर हरभरा व गहू बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

यावर्षीच्या हवामानातील अनिश्चिततेमुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. पिकांच्या नुकसानीनंतर वाढलेल्या आर्थिक ताणामुळे पुनर्पेरणीचा निर्णय घेणे कठीण जात असले तरी यंदा रब्बीत वेळेवर घेतलेला निर्णय आगामी काळात मदत करू शकतो.

दरम्यान हरभरा हे कमी पाण्यात येणारे, अल्प खर्चिक आणि चांगला दर मिळवून देणारे पिक असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे मत कृषी तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.

तसेच, कृषी विभागाकडून पिकपद्धतीत विविधता आणण्यावर भर देण्यात येत असून, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी बदलत्या हवामानाला तोंड देणाऱ्या पिकांची निवड करण्याचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांना दिले जात आहे.

शेतकऱ्यांकडून वेळेवर पेरणी, योग्य आंतरमशागत आणि शेततळी संवर्धनाची अंमलबजावणी केल्यास रब्बी हंगामात चांगले उत्पादन घेता येईल, असा विश्वासही कृषी अधिकारी जगताप यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : नोकरीला नाकारत विठ्ठलरावांनी धरली शेतीची वाट; भाजीपाला शेतीतून ३ एकरांत कमावले उत्पन्न २८ लाख

English
हिंदी सारांश
Web Title : Sow Chickpeas, Recover Losses: Agriculture Officer Advises Farmers.

Web Summary : Due to heavy rains damaging cotton crops, farmers are advised to sow chickpeas in the Rabi season. Agriculture officer Sandeep Jagtap encourages farmers to avail subsidized seeds from the agriculture department to mitigate kharif losses and embrace crop diversification.
टॅग्स :रब्बी हंगामपीकपीक व्यवस्थापनकापूसशेती क्षेत्रशेतकरीशेती